मुंबईः विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. महायुतीच्या विजयानंतर ‘ईव्हीएम’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधक टीका करत आहेत. ‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यावरून आता महायुतीमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीचा विजय झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याचसोबत त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्यामागचे कारण सांगितले आहे.
जानकर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप कोणाला मुख्यमंत्री करेल यात मला अजिबात पडायचे नाही; पण अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. जानकर यांनी सांगितले, की ‘ईव्हीएम’वर माझा आक्षेप असून देशभरात ‘ईव्हीएम’विरोधात आंदोलन करणार आहे. ‘ईव्हीएम’मुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. ‘ईव्हीएम’ हॅक करता येते. मी स्वतः इंजिनीअर आहे. त्यामुळे मला सगळे माहिती आहे. सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
महायुतीमधून बाहेर पडण्यामागचे कारण सांगताना जानकर म्हणाले, की मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळे मी त्यांच्यातून बाहेर आलो आहे. काँग्रेसला अजून चाखले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे. त्यामुळे येत्या काळात आमची वाटचाल ‘एकला चलो’ची असेल. ‘माझ्या पक्षाचा राज्यात सध्या एकच आमदार आहे. कोणासोबत जायचे याचा अजून निर्णय झालेला नाही; पण जर त्या आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला, तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू.’ असा इशारा जानकर यांनी दिला. त्यांनी रासपचे आमदार रत्नागर गुट्टे यांना हा इशारा दिला आहे.