नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधात सीमावाद अडसर ठरू नये, अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी (७ मार्च) स्पष्ट केली. भारत आणि चीनदरम्यान सीमावादासह अन्य महत्त्वाचे प्रश्न आहेत, तथापि ते सुटेपर्यंत सीमेवर शांतता राहिली पाहिजे, एवढे शहाणपण आपल्या दोघांकडे आहे, असे ते म्हणाले.(China)
बीजिंगमध्ये वार्षिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह चीनवर कर लादण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर चीनची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. रशियातील कझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात यशस्वी बैठक झाली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक प्रगती झाली आहे.(China)
‘‘भारत आणि चीन या प्राचीन संस्कृती आहेत. सीमावादाचे निष्पक्ष आणि वाजवी निराकरण झाले पाहिजे, मात्र तोपर्यंत सीमावर्ती भागात शांतता राहावी यासाठी आपल्याकडे पुरेसे ज्ञान आणि क्षमता आहे,’’ असे यी म्हणाले.
‘‘आपण कधीही द्विपक्षीय संबंधांना सीमावाद किंवा विशिष्ट मतभेदांद्वारे परिभाषित करू देऊ नये जेणेकरून आपल्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल. आपण सर्वांत मोठे शेजारी आहोत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या यशात भागीदार असले पाहिजे असे चीनचे मत आहे,” असे ते पुढे म्हणाले.(China)
कझान बैठकीत शी आणि पंतप्रधान मोदी यांनी संबंध सुधारण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन केले होते, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, त्यावेळी दोन्ही बाजूंनी घेतलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचे आपण प्रामाणिकपणे पालन केले. सर्व स्तरांवर देवाणघेवाण आणि व्यावहारिक सहकार्य बळकट केले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत, असे ते म्हणाले.
भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक येथे वादग्रस्त सैन्य माघार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिन्यांनंतर चीनने ही भूमिका घेतली आहे. सैन्य माघार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या भागात ५४ महिन्यांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष संपला आहे. आता द्विपक्षीय संबंध सामान्यीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल चीनने उचलल्याचे दिसत आहे.(China)
करार अंतिम झाल्यानंतर, मोदी आणि शी यांनी २३ ऑक्टोबर रोजी कझानमध्ये चर्चा केली. बैठकीत, दोन्ही बाजूंनी विविध संवाद यंत्रणा पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि वांग यांच्यात १८ डिसेंबर रोजी बीजिंगमध्ये विशेष बैठक झाली.
२६ जानेवारी रोजी, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र सचिव समकक्ष सन वेइडोंग यांच्याशी चर्चा केली.
हेही वाचा :