गौतम बुद्धांकडे एक तत्त्वचिंतक आला. म्हणाला, मी अनेक दार्शनिकांना भेटलो, विचारवंतांना भेटलो. मला जगाविषयी, अस्तित्त्वाविषयी, परमेश्वराविषयी खूप प्रश्न आहेत. ते मी त्यांना विचारले, पण माझ्या प्रश्नांचं उत्तर काही मिळालं नाही. जे मिळालं त्याने समाधान झालं नाही. कुणीतरी मला सांगितलं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बुद्धाकडेच मिळतील, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. विचारू का प्रश्न?
बुद्ध म्हणाले, विचार की. पण, त्याआधी तुला दोन वर्षं माझ्याबरोबर राहावं लागेल. माझ्यासोबत फिरावं लागेल. मी जसं जगतो, तसं जगावं लागेल. त्यानंतर तू ते प्रश्न विचारू शकतोस.
पलीकडे एक ध्यानमग्न शिष्य बसला होता, तो ध्यान सोडून हसू लागला, खो खो, खदखदा हसू लागला…
कसंबसं हसू आवरून तो या नवोदिताला म्हणाला, आताच वेळ आहे तुला. पळ इथून. जा निघून. दोन वर्षांनी तुला काही उत्तर वगैरे मिळणार नाही. मीही दोन वर्षांपूर्वी इथे असाच आलो आणि फसलो.
बुद्ध त्याला म्हणाले, तुझी दोन वर्षं झाली आहेत. आता विचार की प्रश्न?
शिष्य म्हणाला, ते आता पडत नाहीत, पडले तर विचारायची इच्छा होत नाही, हीच तर ती फसवणूक आहे….हे ऐकल्यानंतरही नवोदिताने बुद्धाच्या सोबतीत दोन वर्षं राहण्याचा निर्णय केला. दोन वर्षांनी त्याची प्रश्न विचारण्याची वेळ झाली, तेव्हा तो म्हणाला, मी उत्तरांमध्येच राहतो आहे… आता प्रश्नांचं प्रयोजन काय उरलं?
(ओशोच्या प्रवचनातून)