कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई आणि भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. कोल्हापूरचे आनंद पाटील आणि सोलापूरचे सुशील गायकवाड यांचा सदस्य म्हणून समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ही समिती नेमण्यात आली आहे.
समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव जे. पी. डांगे हे आहेत. महेश भागवत, श्रीमती सुप्रिया देवस्थळी, विनोद मोहितकर, डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह ज्ञान प्रबोधिनीचे विवेक कुलकर्णी हे अन्य सदस्य आहेत.
समितीची कार्यकक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये राज्यातील विध्यार्थ्यांच्या यशस्वीतेचे प्रमाण वाढावे यासाठी ही समिती काम करेल. त्यामध्ये कोल्हापूर, नागपूर अमरावती, नाशिक व औरंगाबाद या प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे. गुणात्मक उपाय योजनांमध्ये अध्यापन, शिक्षण यांसह दिल्ली येथे मुलाखतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखत प्रशिक्षण देणे आदी बाबींचा यात समावेश आहे. या संबंधीचा अहवाल तीन महिन्यात उच्च तंत्र शिक्षण विभागाला सादर करण्यात येणार आहे.