– सतीश घाटगे, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने विपुल असलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीपदाची हॅटट्रीक नोंदवलेल्या प्रकाश आबिटकर यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ गळ्यात पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा पहिला मंत्री आणि राधानगरी मतदारासंघातील पहिला मंत्री म्हणून आमदार आबिटकरांची इतिहासात नोंद झाली आहे. (Prakash Abitkar)
देखणे आणि लोभस व्यक्तिमत असलेल्या प्रकाश आबिटकरांचा गुण हा कायम कार्यकर्त्याचा. एकीकडे शिवसेनेचे नेते, आमदार बाऊन्सर, बॉडीगार्ड, पोलिसांच्या गराड्यात असताना प्रकाश आबिटकर मोकळेपणाने जनतेत वावरतात. त्यामुळे मागील तीन निवडणूकीत नेते एकीकडे आणि जनता एकीकडे असे चित्र राधानगरी मतदारसंघात पहायला मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील भुदरगड किल्ल्याच्या छायेखाली गारगोटी शहरात प्रकाश आबिटकरांची जडणघडण घडली. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत गारगोटीने मोठे योगदान दिले असून हुतात्माचे गाव म्हणून ओळख आहे. करवीरसंस्थानात राजर्षी शाहू महाराजांचे वास्तव्य राधानगरी आणि भुदरगड पेठ्यात असल्याने सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीची ज्योतही याच भागात पेटली. मौनी विद्यापीठातून अनेक विद्यार्थी घडले आणि देशसेवेत रुजू झाले. वयाच्या विसाव्यावर्षी गारगोटीतील युवा संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक कार्यास प्रारंभ केला. शिवाजी विद्यापीठाचे बी.ए. पदवीधर असलेले प्रकाश आबिटकर १९९७ मध्ये भुदरगड पंचायत समितीत अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेतून निवडून आले. जिल्हा परिषदेच्या कामात त्यांनी छाप पाडल्यानंतर भावी आमदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. अभ्यासू व्यक्तीमत्व, कार्यकर्त्यांचे संघटन यामुळे २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली. पहिल्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ३६ हजार ३५९ मते मिळवून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Prakash Abitkar)
२०१४ च्या निवडणूकीत प्रकाश आबिटकर यांच्यावर शिवसेनेची नजर पडली आणि राधानगरी मतदारसंघातून शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून विजयी झाली. त्यांनी आमदार के.पी.पाटील यांचा तब्बल ३९ हजार ४०८ मतांनी पराभव केला. २००९ मध्ये पडलेल्या मताच्या तिप्पट एक लाख ३२ हजार ४८५ मते आबिटकरांनी मिळवली. २०१४ मध्ये जिल्ह्यात आबिटकरांसह, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजीत मिणचेकर, सत्यजीत पाटील, उल्हास पाटील हे सहा आमदार शिवसेनेकडून निवडून आले पण जिल्ह्यात शिवसेनेला मंत्रीपद मिळाले नाही.
२०१९ च्या निवडणूकीत शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी एकमेव आमदार म्हणून प्रकाश आबिटकर निवडून आले. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आणि ते महायुतीत सहभागी झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी प्रामाणिक राहिलेल्या आबिटकरांना मोठा निधी मिळाल्याने मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली.
बिद्रीच्या दूधगंगा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला असला तरी विधानसभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार के.पी. पाटील यांचा पराभव करत प्रकाश आबिटकरांनी आमदारकीची हॅटट्रीक साधली. विधानसभेच्या प्रचारसभेत मंत्रीमंडळातील बॅकलॉग नवीन सरकार आल्यावर पूर्ण केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आबिटकरांना दिलेला शब्द पाळताना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास फोन करुन मंत्रीपदाची शपथ घेण्याचे आमंत्रण दिले. आणि आबिटकरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राधानगरी तालुक्याला पहिल्यांदा आणि जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले आहे.
याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांचे अभिनंदन करून त्यांना मंत्रिपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचा प्रत्येक मंत्री हा राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कायम कटिबद्ध राहील याची मला पूर्ण खात्री आहे. https://t.co/j6bWDhj4EI pic.twitter.com/MzjTS6Nqew
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 15, 2024
हेही वाचा :