न्यूयॉर्क
एक छोट्या आकाराचा लघुग्रह १५ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या लघुग्रहामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. दहा वर्षांतून एकदा अशा पद्धतीने एखादा लघुग्रह पृथ्वीपासून जातो, त्यामुळे अवकाशप्रेमींसाठी ही पर्वणी असल्याचे अवकाश संशोधक सांगतात.
‘२०२४ ओएन’ असे या लघुग्रहाला नाव देण्यात आले आहे. त्याची रुंदी ७२० फूट आहे, याचाच अर्थ या लघुग्रहाचा आकार साधारणतः फुटबॉलच्या दोन मैदानांएवढा आहे. या लघुग्रहाची निर्मिती ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली असण्याचा अंदाज आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून ६.२ लाख मैल (९.९७ लाख किलोमीटर) अंतरावरून जाणार आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्या अंतरापेक्षा हे अंतर २.६ पट आहे. उत्तर गोलार्धामध्ये अवकाशप्रेमींना ही पर्वणी पाहायला मिळणार आहे. ‘२०२४ ओएन’ पृथ्वीजवळून जात असताना, त्याचा आकार, वेग, परिभ्रमण कालावधी आणि प्रवासाचा मार्ग याविषयीची माहिती संकलित करता येईल. तसेच, त्याच्या पृष्ठभागाची निरीक्षणेही संशोधकांना करता येणार आहे.
लघुग्रह म्हणजे काय?
सूर्यमालेच्या निर्मितीनंतर अवकाशामध्ये अनेक खडकांचे तुकडे शिल्लक राहिले. या तुकड्यांचा आकार आणि वजन समान नाही. या तुकड्यांचा सूर्याभोवतीचा प्रवास अखंडित सुरू आहे. मात्र, त्यांच्या कक्षेविषयीही समानता नाही. या खडकांच्या गाभ्यातील पदार्तही वेगवेगळे आहेत. त्यामुळे, प्रत्येक लघुग्रहाची निरीक्षणे करण्यातून विश्वाच्या निर्मितीविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकते, असे मत संशोधक व्यक्त करतात.
‘नासा’कडून संशोधन
अखंडितपणे आणि अनिश्चित कक्षेमध्ये फिरणाऱ्या लघुग्रह पृथ्वीलाही धडकण्याचा धोका आहे. त्यामुळे, या लघुग्रहांच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ‘नासा’कडून संशोधन करण्यात येत आहे. साधारणपणे १५० मीटर (४९२ फूट) व्यासाचे आणि पृथ्वीपासून ७४ लाख किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लघुग्रहांमुळे धोका निर्माण होऊ शकतो, असे मानले जाते. त्यामुळे, अशा लघुग्रहांच्या धोक्यांचा अभ्यास आणि कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नासा लघुग्रह विक्षेपण तंत्रज्ञान विकसित करीत आहे.