सतीश घाटगे : कोल्हापूर: भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. रशियातील ताश्कंद येथे ११ जानेवारी १९६६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त… (Lal Bahaddur Shastri)
महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवर श्रद्धा ठेवत लालबहाद्दूर शास्त्री यांनी वाटचाल केली. साधी राहणी, उच्च विचार, काँग्रेस पक्षांवर प्रचंड निष्ठा आणि कोणत्याची पदांची त्यांना लालसा केली नाही. त्यांच्यातील श्रद्धा, सचोटी, निष्ठा आणि संयमी गुण लक्षात घेऊन पंडित नेहरु यांनी जिल्हा पातळीपासून काँग्रेस सरचिटणीस पदापर्यंत त्यांना संधी दिली. त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामांमुळेच पंडित नेहरु यांच्यानंतर लालबहाद्दूर शास्त्री यांना भारताचे पंतप्रधानपद मिळाले. अवघ्या अठरा महिन्याच्या कारकीर्दीत त्यांनी देशातील गरीबी, बेरोजगारी, अन्नधान्याचे उत्पादन यावर लक्ष केंद्रित केले. भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. भारतीय सैन्याने शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली थेट लाहोर, सियालकोटपर्यंत धडक मारली. अनेक दिवस भारतीय सैन्याकडे हा भाग होता. ताश्कंद करारानंतर युद्धबंदी घोषित झाल्यावर सैन्य माघारी परतले.(Lal Bahaddur Shastri)
गरिबीत बालपण
शास्त्री दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आई रामदुलारी यांनी वडील आणि नातेवाईकांच्या मदतीने कुटुंबाचे पालनपोषण केले. अतिशय गरीबीत त्यांचे बालपण गेले, पण भविष्यात मोठे पद मिळाल्यानंतरही त्यांनी त्याची कधीच वाच्यता केली नाही. शिक्षणाचा श्रीगणेशा उर्दूमध्ये झाला. गावातील मौलवींनी ‘बिस्मिल्ला’ म्हणत ‘दीक्षा’ देण्यास सुरुवात केली. त्यांच्या हाताखाली लालबहाद्दूर यांनी केवळ उर्दूचेच नव्हे तर तहजीब म्हणजे सामाजिक शिष्टाचाराचे शिक्षण घेतले. त्यांना उर्दू साहित्याची विशेषत: कवितेची आवड होती. मिर्झा गालिब यांच्या कवितेवर त्यांचे प्रेम होते.
वर्मा आडनावावरुन शास्त्री
लालबहाद्दूर यांचे आडनाव वर्मा होते. वर्मा हे जातिवाचक आडनाव लावण्याची माझी इच्छा नाही, असे सांगत शाळेतील रेकॉर्डमधून त्यांनी वर्मा नाव वगळण्यास सांगितले. १९२५ मध्ये बनारस येथील काशी विद्यापीठात शास्त्री ही पदवी मिळाल्यानंतर त्यांच्या नावाला शास्त्री उपाधी जोडली गेली. बनारसला शिक्षण सुरू असताना १९२१ मध्ये महात्मा गांधी यांच्या भाषणाचा त्यांच्यावर परिणाम झाला. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सरकारी शाळेतील नाव काढून टाकले. काँग्रेस पक्षात स्वयंसेवक म्हणून काम करु लागले. पक्षाच्या निदर्शनांत सहभागी झाल्याबद्दल वयाच्या १६ व्या वर्षी त्यांना पहिला कारावास घडला. शास्त्रीजींनी काशी विद्यापीठात प्रवेश घेतला. ‘डॉ. भगवानदास यांचे तत्त्वज्ञान’ या विषयावर शास्त्री पदवीसाठी प्रबंध लिहिला. ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांच्या नावासमोर शास्त्री उपाधी लागली.(Lal Bahaddur Shastri)
ललितांशी विवाह
लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या ‘द सर्व्हंट्स ऑफ पीपल सोसायटी’च्या माध्यमातून शास्त्रींनी समाजसेवेस वाहून घेतले. दलितांच्या वस्तीत मुलांना शिक्षण देणे, प्रौढ साक्षरता वर्गाचे काम सुरू केले. त्यांना ६० रुपये मानधन मिळत असे. अलाहाबाद नगरपालिका बोर्डाचा सदस्य म्हणून शास्त्रींची निवड झाली. शास्त्रींचा विवाह १६ मे १९२८ रोजी ललिता यांच्याशी झाला. हुंडा घेण्यास शास्त्रींनी नकार दिला. फक्त चरखा आणि खादीचे कापड त्यांनी स्वीकारले. ललितादेवी या समजूतदार होत्या. ‘तू तुझ्या सर्व रेशमी साड्या वाटून टाक आणि खादीच्या साड्या वापरायला सुरूवात कर’ हा पतीचा सल्ला त्यांनी तंतोतंत मानला.
पंडित नेहरुंशी संपर्क
काँग्रेस पक्षाचे काम करत असताना त्यांचा अलाहाबादमध्ये पंडित नेहरु यांच्याशी संबंध आला. नेहरूंच्या ‘स्वराज्य भवना’त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यालय होते. त्या कार्यालयात शास्त्रींनी कर्मचारी म्हणून काम केले. शास्त्रींचा शालीन आणि प्रेमळ स्वभाव पंडित नेहरुंच्या नजरेत भरला. तेव्हा नेहरू शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. नेहरुंचे मदतनीस म्हणून शास्त्री काम करु लागले. नेहरुंची काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर पक्षाचा मसुदा उर्दू आणि इंग्रजी भाषेत तयार करण्याचे कामही शास्त्री करु लागले.(Lal Bahaddur Shastri)
उत्तर प्रदेशची जबाबदारी
१९३० मध्ये नेहरुंनी शास्त्री यांच्यावर विश्वास टाकत जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकली. १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत शास्त्रींना अटक झाली. अडीच वर्षाचा तुरुंगवास झाला. नंतरच्या घडामोडीमुळे त्यांची एक वर्षात सुटका झाली. १९३० ते १९४५ या कालावधीत शास्त्रींना सात वर्षाचा तुरुंगवास झाला. मुलगा आणि मुलगी आजारी असतानाही त्यांनी तुरुंगातून पॅरोलवर बाहेर जाण्यास नकार दिला होता. १९३५ मध्ये पंडित नेहरुंवर जबाबदाऱ्या वाढल्याने शास्त्रींना थेट उत्तर प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली. १९३६ मध्ये अलाहाबाद जिल्हाध्यक्षपदावर निवडून आले. अलाहाबाद म्युनिसिपल बोर्डावरही त्यांची निवड झाली. अलाहाबादवरुन शास्त्रींचे काम लखनौवरुन सुरू झाले. जिल्हा समित्यांची संघटनात्मक काम करणे आणि प्रादेशिक नेत्यांशी संपर्क राखणे हे त्यांचे काम होते. उत्तर प्रदेशातील शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे ते म्हणणे ऐकून घेत. जमिनदारी पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी नवीन कायदा करण्याचे काम काँग्रेसने हाती घेतले. त्याची जबाबदारी शास्त्रींवर देण्यात आली. अतिशय गुंतागुंतीच्या कामात त्यांनी वाहून घेतले. उपलब्ध कागदपत्रे आणि कायद्यातील तरतुदींचा अभ्यास केला. तपशीलवार अहवाल तयार करताना त्यांनी व्यवहार्य शिफारशी केला. त्यांच्या अहवालानंतर १९३७ मध्ये उत्तर पदेशात जमीन सुधारणा कायदा करण्यात आला.
अलाहाबादमधून शास्त्री विजयी
१९३५ च्या कायद्यानुसार देशात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत १९३७ मध्ये शास्त्री अलहाबाद येथील एका मतदारसंघातून विजयी झाले. उत्तर प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळाले. दुसऱ्या महायुद्धात भारताला युद्धात सहभागी करण्याच्या घोषणेनंतर भारतातील सर्व राज्य सरकारनी राजीनामे दिले. सततच्या कामांमुळे शास्त्री आजारी पडले. तीन दिवस त्यांची वाचा गेली होती. पण जीवघेण्या आजारातून ते बाहेर पडल्यावर काँग्रेसच्या १९४१ च्या वैयक्तिक सत्याग्रहात सहभागी झाले. त्यांना अटक झाली. पाच महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा झाली. १९४२ ला भारत छोडो आंदोलनाची घोषणा झाली. महात्मा गांधी, पंडित नेहरु, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक नेत्यांना अटक झाली. मुंबईतील अधिवेशनाला शास्त्री उपस्थित होते. ९ ऑगस्टला त्यांनी गुपचूप मुंबई सोडली. ते रेल्वेने अलाहाबादला निघाले. आपल्याला अटक होईल या शक्यतेने ते अलाहाबादला न उतरता पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी एका उपनगरी स्टेशनवर उतरले. भूमिगत काम सुरू केले, पण थोड्याच दिवसांना त्यांना अटक झाली आणि तीन वर्षाची शिक्षा झाली.(Lal Bahaddur Shastri)
गृह आणि वाहतूक खात्याचे मंत्री
१९४५ ला देशात निवडणुका झाल्या. अलाहाबाद येथील एका मतदारसंघातून ते विजयी झाले. ते गृह आणि वाहतूक खात्याचे मंत्री झाले. मुख्यमंत्र्यांच्या संसदीय सचिवपदीही त्यांची निवड झाली. गोविंद वल्लभ पंत मुख्यमंत्री होते. मंत्रिपदावर काम करताना त्यांनी काँग्रेसच्या आमदारांसह विरोधी पक्षाच्या आमदारांबरोबर सौहार्दाचे संबंध ठेवले. त्यांची राहणी साधी होती. गृहमंत्री म्हणून काम करताना कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवले पाहिजे याकडे कटाक्ष होता, पण पोलिसांनी दडपशाही न करता मानवतावादी दृष्टिकोनातून पोलिसांनी काम केले पाहिजे असे त्यांचे मत होते. लाठीमारापेक्षा पाण्याचा फवारा मारण्यावर भर द्यावा, अशी सूचनाही त्यांनी त्यावेळी केली होती.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस
स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरु पंतप्रधान झाले. १५ डिसेंबर १९५० रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले. त्यानंतर देशात नेहरु युग सुरू झाले. पंडित नेहरुंनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी शास्त्रींवर दिली. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन शास्त्री लखनौवरुन दिल्लीला आले. नेहरु आपल्या कार्यात मग्न असल्याने पक्षाच्या संघटनात्मक जबाबदारी बऱ्याचअंशी शास्त्रींवर सोपवली. १९५२ ला देशात प्रथमच प्रौढ मतदान पद्धतीने निवडणूक झाली. काँग्रेस पक्षाची जबाबदारी शास्त्रींवर पडली. देशभर दौरे, पक्ष कार्यकर्त्यांना भेटी, मार्गदर्शन, उमेदवारांच्या याद्या तयार करणे असा मोठा व्याप शास्त्रींवर होता. १९५२ च्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले.(Lal Bahaddur Shastri)
नेहरु मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री
नेहरुंनी आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात शास्त्रींचा समावेश केला. शास्त्री निवडणूक लढले नव्हते, पण त्यांना राज्यसभेवर संधी दिली. ते रेल्वे व वाहतूक खात्याचे मंत्री झाले. उत्तर प्रदेशात मंत्री म्हणून काम केल्याने केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वी पेलली. ते रात्री उशिरापर्यंत काम करत. सर्वपक्षीय खासदारांना वेळ देत. त्यांना भेटणाऱ्या खासदारांना त्यांच्याविषयी आदर वाटत होता. रेल्वेमंत्री म्हणून काम करताना त्यांनी प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता वाढवण्यास प्रोत्साहन दिले. लांब पल्ल्याच्या रेल्वेत तिसऱ्या वर्गातील प्रवाशांसाठी जादा डब्यांची सोय केली. दिल्ली, मुंबई, मद्रास, कलकत्ता ए.सी. रेल्वेगाड्या सुरु केल्या. रेल्वेतील जेवणाचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष दिले.
रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा
एका बाजूला रेल्वेचा कारभार सुरळीत सुरू असला तरी वारंवार होणाऱ्या अपघातामुळे ते व्यथित होत. १९५६ मध्ये मेहबूबनगर येथे झालेल्या रेल्वे अपघातात ११२ प्रवासी ठार झाले. रेल्वेमंत्री या नात्याने अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारुन शास्त्रींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण नेहरुंनी तो नाकारला. पण पुन्हा नोव्हेंबर १९५६ मध्ये दक्षिण भारतातील अरिवालून येथे झालेल्या अपघातात १४४ प्रवासी ठार झाले. यावेळी शास्त्रींनी राजीनामा दिला. यावेळी मात्र नेहरुंनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. राजीनाम्यामुळे शास्त्रींची नैतिक प्रतिमा अधिक उंचावली.
दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात समावेश
१९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी नेहरुंनी शास्त्रींना काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी दिली. या कामात गुंतल्याने त्यांना स्वत:च्या अलाहाबाद मतदारसंघात जाता आले नाही. तरीही ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. नेहरुंनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. वाहतूक व दळणवळण खात्याचे ते मंत्री झाले. त्यांनी नौकानयन विकासाला, बोटी बांधण्याला प्राधान्य दिले. मुंबईतील नॉटिकल अँड इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षणाच्या योग्य सोयी उपलब्ध करुन दिला. १९५८ मध्ये त्यांच्याकडे वाणिज्य व उद्योग खाते सोपवून बढती देण्यात आले. ते रात्री उशिरापर्यंत काम करत. सततच्या कामाच्या दगदगीमुळे १९५८ मध्ये अलाहाबाद दौऱ्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. काही आठवड्याची विश्रांती घेऊन ते पुन्हा कामावर रुजू झाले. नवीन औद्योगिक प्रकल्प उभारणे, निर्यातीला प्रोत्साहन या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांच्याकाळात एचएमटीची स्थापना झाली. नानगल खत कारखान्यात उत्पन्न सुरू झाले.(Lal Bahaddur Shastri)
केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी
गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या निधनानंतर देशाचे नवी गृहमंत्री म्हणून शास्त्रींची निवड करण्यात आली. अन्य मंत्र्यांच्या तुलनेत शास्त्रींची मंत्रिमंडळात वेगात आगेकूच सुरू होती. केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंधाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री आणि राज्यपालांशी त्यांना सातत्याने संपर्क ठेवावा लागे. आसाममधील आसामी आणि बंगाली भाषेतील वाद त्यांनी यशस्वीरित्या हाताळला. फुटीर प्रवृत्तींना वाव मिळू नये आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वांनी झटावे या हेतूने त्यांनी सर्व पक्षांची राष्ट्रीय एकात्मता परिषद आयोजित करुन एक नियमावली सुरू केली. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील भाषावाद त्यांनी समाधानकारकरित्या हाताळला.
पहिली आणीबाणी शास्त्रींकडून जाहीर
१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर देशात आणीबाणी अंमलात आणण्याची गृहमंत्री शास्त्री यांच्यावर जबाबदारी पार पडली. चीनने सैन्य मागे घेतल्यानंतर काही काळ देशात आणीबाणी सुरू होती. चीन युद्धानंतर शेजारच्या देशांशी संबंध सुधारण्याची गरज होती. पंतप्रधान नेहरुंनी शास्त्रींना नेपाळ दौऱ्यावर पाठविले. त्यावेळी नेपाळ चीन आणि पाकिस्तानकडे झुकत होता. पण शास्त्रींनी राजे महिंद्र, नेपाळचे पंतप्रधान तुलसी गिरी, गृहमंत्री विश्वबंधू थापा यांच्या भेटी घेऊन भारताशी सलोख्याचे संबंध जोडले.
नेहरुनंतर कोण? लालबहाद्दूर शास्त्री…
१९६४ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन भुवनेश्वरला होते. नेहरुंना मोठा हृदयविकाराचा झटका आला. अधिवेशनावर चिंतेचे सावट होते. नेहरुंच्या आजारपणाचे वृत्त देण्याची जबाबदारी पक्षाने शास्त्रींकडे दिली. अधिवेशनात विषय समितीच्या बैठकीत लोकशाही आणि समाजवाद हे महत्त्वपूर्ण ठराव मांडण्याची जबाबदारी गुलजारीलाल नंदा, मोरारजी देसाई यांच्याऐवजी शास्त्रींवर सोपवली. त्यामुळे नेहरुनंतर कोण? या प्रश्नांच्या चर्चेमध्ये शास्त्री यांचे नाव पुढे येऊ लागले. या अधिवेशनातंर नेहरुनंतर शास्त्रीच पंतप्रधान होती,ल अशी चिन्हे दिसू लागली. अधिवेशनातंर पंतप्रधान नेहरु यांनी शास्त्रींना पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतले. त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, अणुशक्ती विभाग ही खाती देण्यात आली. तसेच बिनखात्याचे मंत्री म्हणून पंतप्रधानांकडून येणारी कागदपत्रे शास्त्रींकडे येऊ लागली. पंतप्रधानांच्या साउथ ब्लॉकशेजारीच शास्त्रींना कार्यालय देण्यात आले.
पाकच्या नांग्या ठेचल्या
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लालबहाद्दूर शास्त्री यांची पंतप्रधानपदी निवड झाली. नेहरुंच्या मृत्यूनंतर भारताचे कसे होणार, अशी चर्चा सुरू होती. चीन युद्धामुळे भारत कुमकुवत झाला आहे, अशी धारणा जागतिक राजकारणात सुरू झाली. पाकिस्ताननेही भारतांवर आक्रमण सुरू करण्यासाठी पावले उचलली. पंतप्रधान शास्त्री आणि तत्कालीन सरंक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज केले. काश्मिर प्रश्नावरुन पाकिस्तानने भारतात सैनिकांच्या वेषात दंगेखोर घुसवले. पाकिस्तानमधील अखनूर काबीज करुन भारताची रसद तोडण्याचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला. ‘युनो’त भारताची बाजू मांडण्यात आली. पण पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी पंतप्रधान शास्त्री यांनी पंजाब, गुजरातमधून युद्धात दुसरी आघाडी उघडली. पाकिस्तानने पंजाबवर कब्जा करण्याचे ठरवले होते. पण भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानच्या भूमीवर आघाडी घेत थेट लाहोर शहरापर्यंत धडक मारली. चीन युद्धात भारतीय विमानदलाला परवानगी दिली नव्हती. पण पंतप्रधान शास्त्रींनी वायुसेनाला ‘गो अहेड’ चा आदेश देताच भारतीय विमानांनी लाहोरपर्यंत बॉम्बफेक केली. अमेरिकेने पुरवलेले शक्तिशाली पॅटन रणगाडे भारतीय पायदळाने उद्ध्वस्त केले. पाक शरण आला आणि शास्त्रींचे नेतृत्व झळाळून गेले. लाहोरपर्यंतचा प्रदेश साडेतीन महिने भारताच्या ताब्यात होता. पंतप्रधान शास्त्री आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी युद्धभूमीला भेट दिली. लाहोरजवळील भारतीय लष्कराने काबीज केलेल्या भागाची पाहणी केली. भारतीय सैन्याने निकामी केलेल्या पॅटन रणगाड्यावर उभा राहून त्यांची छायाचित्रे घेली. त्यांच्या ‘जय जवान, जय किसान’ घोषणेला भारतीयांनी प्रतिसाद दिला.
भारत पाकिस्तान युध्दानंतर दोन्ही देशात करार करण्यासाठी रशियाने पुढाकार घेतला. सोव्हिएत राजकारणी अलेक्सेई कोसिगिन यांनी प्रतिनिधित्व केले. भारताचे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री आणि पाकिस्तानचे अध्यक्ष मुहम्मद अयुब खान यांनी ताश्कंद करारावर सह्या केल्या. ताश्कंद करार झाल्यानंतर पंतप्रधान शास्त्री यांचे रशियात निधन झाले. भारतीयांच्या मनावर त्यांचे नाव कायम कोरले गेले.
हेही वाचा :