महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : हमासच्या सैनिकांनी इस्रायलमध्ये घुसून १२०० लोकांची कत्तल केली आणि सुमारे २५० नागरिकांना ओलीस ठेवले होते. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रत्युत्तरात इस्रायलने युद्ध घोषित केले. हमासचा नाश होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याची शपथ घेतली. इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ४२ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात हमासचे हजारो सैनिक मारल्याचा इस्रायलयने दावा केला आहे. तसेच गाझामधील हमासचे बोगद्यांचे जाळे उद्ध्वस्त केल्याचा दावाही केला आहे. (hamas vs Israel)
या एका वर्षात हे युद्ध केवळ गाझापुरते मर्यादित राहिले नाही. इराण, लेबनॉन, येमेन, इराक आणि सीरियापर्यंत या युद्धाची झळ पोहोचली. लेबनॉनमध्ये हिज्बुल्लाहविरोधात इस्रायली लष्कराची कारवाई अनेक आठवड्यांपासून सुरू आहे. इराण आणि इस्रायलमध्येही तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणने या वर्षात दोनदा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.
गाझामध्ये ४० हजार ठिकाणी बॉम्बफेक
इस्रायली लष्कराने सांगितले की, एका वर्षात गाझा पट्टीतील हमासच्या ४० हजाराहून अधिक ठिकाणांवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. त्याच वेळी, हमासचे ४,७०० बोगदे आणि १,००० रॉकेट लाँचर साइट्स नष्ट करण्यात आल्या. युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधून इस्रायलवर सुमारे १०,००० रॉकेट डागण्यात आली. गाझा व्यतिरिक्त लेबनॉनमधून १२,४००० रॉकेट, इराणकडून ४००, येमेनमधून १८० आणि सीरियातून ६० रॉकेट डागण्यात आले आहेत. (hamas vs Israel)
इस्रायलने किती जणांना मारले?
७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या युद्धात गाझा पट्टीमध्ये एका वर्षात ४२ हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासच्या सैनिकांनी इस्रायलमध्ये घुसून १,२०० नागरिकांची हत्या केली होती. २५० लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. त्यातील १०० हून अधिक ओलीस अजूनही हमासच्या ताब्यात आहेत.
इस्त्रायली लष्कराने सांगितले की, लेबनॉनमध्ये ८०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. लेबनॉनमध्ये जमिनीवरील ६ हजारांहून अधिक लक्ष्ये नष्ट करण्यात आली आहेत. एका वर्षात इस्रायलने वेस्ट बँक आणि जॉर्डन व्हॅलीमधून ५ हजारांहून अधिक संशयितांना अटक केली आहे.
इस्रायलचे किती नुकसान?
या युद्धात आतापर्यंत ७२६ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. ७ ऑक्टोबर रोजी ३८० सैनिक मारले गेले, तर त्यानंतर गाझामध्ये ३४६ सैनिकांचा मृत्यू झाला. याशिवाय ४,७५६ इस्रायली सैनिक जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या ५६ जवानांचाही मृत्यू झाला आहे. इस्रायलने सांगितले की, एका वर्षात ३ लाखांहून अधिक सैनिकांची भरती करण्यात आली आहे. यापैकी ८२% पुरुष आणि १८% महिला आहेत. त्यापैकी बहुतेकांचे वय २० ते २९ वर्षे आहे.
हेही वाचा :