महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर आटोपला. यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ मैदानावर उतरला आहे, चौथ्या दिवशी (दि.१९) किवी कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे नाबाद आहेत. (IND Vs NZ)
सामन्यावर न्यूझीलंड मजबूत पकड
बंगळुरू कसोटीचा निकाल सामन्याच्या पाचव्या दिवशी होणार आहे. सध्या सामन्यावर न्यूझीलंडची मजबूत पकड आहे. भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर गुंडाळल्यामुळे बंगळुरू कसोटीत विजय मिळवण्यासाठी किवी संघापुढे अवघ्या १०७ धावांचे आव्हान आहे.
पाचव्या दिवशी वरूण राजाची ‘फलंदाजी’ ?
पाचव्या दिवसाचा खेळ पावसाने वाहून जावा. यामुळे सामना अनिर्णित राहील, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. पावसामुळे बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस वाहून गेला होता. Accuweather.comने दिलेल्या माहितीनुसार बेंगळुरू कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाची शक्यता आहे. बंगळुरूमध्ये पावसाची ८० टक्के शक्यता आहे. सकाळी ९ ते १० वाजता पावसाची ५१ टक्के शक्यता आहे, तर पुढील दोन तासांचा अंदाज अनुक्रमे ४७ आणि ४५ टक्के आहे. तर दुपारी १ वाजता पावसाचा अंदाज ४९ टक्के, दुपारी 2 वाजता ५१ टक्के आणि दुपारी ३ वाजता ५५ टक्के वर्तवण्यात आला आहे. तर दुपारी ४ वाजता पावसाची शक्यता ३९ टक्के आहे. (IND Vs NZ)
दुसऱ्या डावात भारताची घसरगुंडी
बंगळुरू कसोटीत भारतीय संघाचा डाव अवघ्या ४६ गुंडाळला. यानंतर रचिन रवींद्रच्या (१३४ धावा) शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा केल्या. यामुळे न्यूझीलंडला ३५६ धावांची मोठी आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. यावेळी भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात ४०८ धावा केल्या. यामुळे भारतीय संघ सामन्यात मोठी आघाडी घेणार असे चित्र होते. परंतु, सर्फराज खान बाद झाल्यानंतर विकेट पडत राहिल्या. भारताने ५४ धावांत सात विकेट गमावल्या. सर्फराज खानने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून शानदार कामगिरी केली. तर ऋषभ पंतने ९९ धावांची खेळी केली. विराट कोहली (७०) आणि कर्णधार रोहित शर्मा (५२) यांनीही अर्धशतकी खेळी खेळली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि विल्यम ओ’रूर्कने दुसऱ्या डावात प्रत्येकी तीन बळी घेतले.
हेही वाचा :