देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला. ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल.स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने देशाची सेवा करण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी योगदान दिले. आज ते आपल्यात नाहीत आणि त्यामुळे होणारी अस्वस्थता वेगळी आहे. मनमोहन सिंग यांचा पिंड हा राजकारणी नव्हता. ते एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते, विचारवंत होते आणि सतत देशाचे भवितव्य घडविण्यासाठी काय करायची आवश्यकता आहे, याचा विचार करण्याची भूमिका घेत होते.त्यांचा आणि माझा परिचय हा मुंबईत झाला होता. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून मुंबईत काम करत होते. त्यामुळे साहाजिकच कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आमचा सुसंवाद होत असे. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्याबद्दलचे आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झाले. नंतरच्या काळात चंद्रशेखरसिंह हे देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांच्या कार्यकाळात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांचे जे काही सहकारी होते. त्यांच्यामध्ये मनमोहन सिंग सुद्धा होते. त्यानंतरच्या काळात नरसिंहराव यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी आणि मी तेव्हा संरक्षण मंत्री होतो.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या ज्या एक दोन समित्या तयार करण्यात यायच्या, त्यामध्ये आम्ही दोघे सुद्धा होतो. त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचे विविध विषयातील निर्भीड विचार ऐकण्याची संधी मिळत असे. ते मितभाषी होते, पण आपल्या भूमिकेशी पक्के होते. देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर त्या १० वर्षामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. आर्थिक संकटाच्या काळात देशाला सावरण्याचे काम त्यांनी नरसिंहराव पंतप्रधान असताना केले आणि स्वतः पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अधिक भरीव असे निर्णय घेऊन देशाला मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढले. त्यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले आणि सबंध देशाला एका वेगळ्या दिशेला नेण्याचे काम त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांची मोठी प्रतिष्ठा होती.-शरद पवारदेशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला:
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील.-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारताला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या कार्याचा पाया रचला
भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांचे निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया त्यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचं बहुतांश श्रेय डॉ. मनमोहनसिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे,-उपमुख्यमंत्री अजित पवारदूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले
डॉ मनमोहन सिंग यांनी आधी वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असतांना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलली आणि अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करून एक नवी आर्थिक क्रांती आणली. साध्या सरळ आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग यांनी एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवली होती. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असा ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले आहे.-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमहान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी काळाच्या पडद्याआड
देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा त्यांनी पाया घातला. अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधन म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली. पंतप्रधान पदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अधिका-यांना कायद्याचे रूप देत संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या रांगेतील लोकांना मिळतील याची काळजी घेतली. दहा वर्षाचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे.
-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी संसदपटू गमावला –
डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले. विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्व गमावले आहे.– राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनइतिहास त्यांचा गौरव करेल
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावे, यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. सिंग आहेत. त्यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवले ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेला नाही.-राज ठाकरेभारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे नेतृत्व हरपले
डॉ. मनमोहनसिंग यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच भारताने आर्थिक क्षेत्रात जगात मोठा टप्पा गाठला आहे. अत्यंत साधे व्यक्तिमत्व, मितभाषी असणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने भारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे दूरदृष्टीचे नेतृत्व हरले आहे, आव्हानात्मक काळात त्यांनी भारताला अत्यंत आवश्यक असलेले आर्थिक नेतृत्व, जागतिक मान्यता, स्थिरता आणि एकता प्रदान केली. उगवत्या भारताच्या इतिहासात एक अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून त्यांचे योगदान कायमचे कोरले जाईल. डॉ. मनमोहनसिंग यांचा वारसा परिवर्तनशील नेतृत्वाचा आहे, जो पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहिल.-खा. वर्षा गायकवाड
मुंबई; विशेष प्रतिनिधी : (Dr Manmohan Singh) : जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ व भारताचे देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याबाबतच्या आठवणी जागा करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यापैकी काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया अशा: