प्रवीण कांबळे, हातकणंगले : हातकणंगले (राखीव) विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे दलितमित्र अशोकराव माने यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे व माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा धक्कादायक पराभव केला. अशोकराव माने हे तब्बल ४६ हजार ६२८ मताधिक्याने विजयी झाले. या विजयामुळे महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या भाजप, शिंदे गट (शिवसेना),जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.
हातकणंगले येथील धान्य गोदामात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका असलेल्या हातकणंगले मतदारसंघात सुरुवातीपासूनच दलितमित्र अशोकराव माने यांना प्रत्येक फेरीला हजाराचे मताधिक्य मिळत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास हातकणंगले मतदान केंद्रांवरील २४ टेबलवर २१ फेऱ्यांत मत मोजणी झाली. यात महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर स्वाभिमानीचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांना जोराचा धक्का बसला आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात एकूण ५८ गावांचा समावेश असून ३ लाख ४१ हजार ६८१ पैकी २ लाख ६१ हजार २२८ मतदारांनी मतदान केले होते. सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे उमेदवार अशोक माने यांनी आघाडी घेतली. तीच आघाडी त्यांनी शेवटपर्यंत राखून ठेवली. अखेरच्या २१ व्या फेरीस ४६,६२८ मतांचे मताधिक्य घेत त्यांनी विजयश्री खेचून आणत मतदारसंघात परिवर्तन केले, तर दुसरीकडे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे, शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी करून स्वाभिमानीच्या गोटात सामील झालेले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना मात्र पराभावाला सामोरे जावे लागले. अखेरीस १ लाख ३४ हजार १९१ मते घेत दलितमित्र अशोकराव माने यांना विजयी घोषीत करण्यात आले.