चांदीपूर; वृत्तसंस्था : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर येथून एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी केली. मोबाईल आर्टिक्युलेटेड लाँचरद्वारे ओडिशाच्या किनारपट्टीवर ही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची क्षमता वाढली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत नौदलात सुमारे २०० स्वदेशी लांब पल्ल्याच्या अटॅक क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश करू शकतो. अशा परिस्थितीत,‘डीआरडीओ’ने त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी सुमारे २० अतिरिक्त चाचणी उड्डाणांची योजना आखली आहे. त्यात स्वदेशी रेडिओ-फ्रिक्वेंसीद्वारे टर्मिनल होमिंगचादेखील समावेश आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रडार हे लाँग रेंज अटॅक क्रूझ क्षेपणास्त्र एक मिशन मोड प्रकल्प आहे. तो ‘डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिल’ने ‘ॲक्सेप्टन्स ऑफ रिक्वायरमेंट’अंतर्गत मंजूर केला आहे. समुद्रात मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र भारतीय सशस्त्र दलाच्या विशेषत: नौदलाच्या सामर्थ्याला जबरदस्त चालना देईल. या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे निरीक्षण करण्यासाठी, ’आयटीआर’ द्वारे रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम आणि टेलीमेट्रीसारखे अनेक रेंज सेन्सर वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित केले गेले.
लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राची दोनशेची ऑर्डर मिळणे अपेक्षित आहे. त्याची किंमत अंदाजे पाच हजार कोटी रुपये आहे. भारताच्या या स्वदेशी क्षेपणास्त्राची तुलना अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राशी केली जात आहे. अमेरिकेचे टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र हे एक अचूक शस्त्र आहे जे जहाज, पाणबुडी आणि जमिनीवरून सोडले जाऊ शकते. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेले भारताचे ‘लाँग रेंज लँड ॲटॅक क्रूझ मिसाइल’ हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. ते शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे.
ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगवान
हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करू शकते. त्यामुळे ते शत्रूच्या संरक्षण यंत्रणेला चकमा देऊ शकते. त्याचे आक्रमण अंतर खूप जास्त आहे, ज्यामुळे ते शत्रूच्या लक्ष्यांना सहजपणे लक्ष्य करू शकते. यात एक प्रगत मार्गदर्शन प्रणाली आहे, जी अचूकतेने लक्ष्य गाठण्यास मदत करते.