नवी दिल्ली : वृत्तसंस्था : टोमॅटोची किंमत सुमारे २२ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पुरवठा वाढल्याने टोमॅटोचे भाव कमी झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बाजारातील टोमॅटोच्या घाऊक किमती कमी झाल्यामुळे, किरकोळ किंमतदेखील कमी होत आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले, की १४ नोव्हेंबर रोजी टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत ५२.३५ रुपये प्रति किलो होती. १४ ऑक्टोबरला हीच किंमत ६७.५० रुपये प्रति किलो होती. याचा अर्थ भावात २२.४ टक्के वाढ झाली आहे. टोमॅटोची आवक वाढल्याने आझादपूर मंडईतील भाव ५,८८३ रुपये प्रति क्विंटलवरून २,९६९ रुपये प्रति क्विंटलवर जवळपास ५० टक्क्यांनी घसरले. पिंपळगाव, मदनपल्ले आणि कोलार यांसारख्या बेंचमार्क मार्केटमधूनही मंडीच्या दरात अशीच घसरण नोंदवली गेली आहे.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, २०२३-२४ मध्ये टोमॅटोचे एकूण वार्षिक उत्पादन चार टक्क्यांनी वाढून २१३.२० लाख टन होईल, असा अंदाज आहे. २०२२-२३ मध्ये ते २०४.२५ लाख टन होते. टोमॅटोचे उत्पादन वर्षभर होत असले, तरी उत्पादन क्षेत्र आणि उत्पादनाच्या प्रमाणात हंगामी फरक असतो. प्रतिकूल हवामान आणि पुरवठ्यातील किरकोळ व्यत्यय यांचाही टोमॅटोच्या किमतीवर मोठा परिणाम होतो. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये जास्त आणि लांबलेल्या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये टोमॅटोच्या किमतीत वाढ झाली होती. भारतातील विविध क्षेत्रांमध्ये टोमॅटोच्या उत्पादनावरील सामान्य हंगामी परिणाम दर्शवितो, की टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये लागवड ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होते. तथापि, पीक लागवडीचा कालावधी कमी असल्याने आणि टोमॅटोच्या अनेक तोड्यांमुळे बाजारात टोमॅटोची सतत उपलब्धता आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, मदनप्पल आणि कोलार या प्रमुख टोमॅटो केंद्रांवर आवक कमी झाली आहे; परंतु महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांतून हंगामी आवक झाल्यामुळे भाव कमी झाले आहेत. या हंगामी आवकेमुळे देशभरातील टोमॅटोची कमतरता पूर्ण होत आहे.