दुबई, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात एकूण आठ बळी घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थान पटकावले आहे. याच कसोटीत शतक ठोकणारा भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
पर्थ कसोटीत बदली कर्णधाराची जबाबदारी पार पाडताना बुमराहने पहिल्या डावात ५, तर दुसऱ्या डावात ३ विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने हा सामना २९५ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या कसोटीत सामनावीर ठरलेल्या बुमराहने ८८३ गुणांसह गोलंदाजी क्रमवारीत अग्रस्थान मिळवले. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात बुमराह या क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला होता. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा ८७२ गुणांसह दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ८६० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. भारताचे रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोघे फिरकीपटूही अव्वल दहामध्ये असून अश्विन ८०६ गुणांसह चौथ्या, तर जडेजा ७९४ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
यशस्वी जैस्वालने पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात १६१ धावांची दमदार खेळी केली होती. या खेळीचा फायदा त्याला फलंदाजांच्या क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी झाला असून तो ८२५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने आजवरच्या कारकिर्दीत मिळवलेले हे सर्वोच्च स्थान आहे. या क्रमवारीमध्ये इंग्लंडचा जो रूट पहिल्या स्थानावर असून त्याच्या खात्यात ९०३ गुण आहेत. न्यूझीलंडचा केन विल्यमसन ८०४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अव्वल दहा फलंदाजांमध्ये यशस्वीव्यतिरिक्त भारताच्या केवळ रिषभ पंतला स्थान मिळवता आले असून तो ७३६ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, पर्थ कसोटीत नाबाद शतक झळकावणारा भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीचीही क्रमवारीत सुधारणा झाली असून तो ६८९ गुणांसह तेराव्या स्थानी पोहोचला आहे.
भारताच्या जडेजा आणि अश्विन या दोघांचाही समावेश पर्थ कसोटीसाठी अंतिम संघामध्ये करण्यात आला नसला, तरी कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत ते अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी कायम आहेत. या क्रमवारीत जडेजाचे ४२३, तर अश्विनचे २९० गुण आहेत. सांघिक कसोटी क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया १२४ गुणांसह पहिल्या, तर भारत १११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाच्या खात्यात १०५ गुण आहेत.