क्वालालंपूर : सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीचे मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये वर्षातील पहिले विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न शनिवारी भंगले. या स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीमध्ये सात्विक-चिराग जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. सात्विक-चिरागच्या पराभवामुळे भारतीय बॅडमिंटनपटूंचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. (Malaysia Open)
सात्विक-चिराग जोडीला या स्पर्धेत सातवे मानांकन होते. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या किम वोन हो-सेओ सेउंग जे या जोडीने सात्विक-चिराग यांच्यावर २१-१०, २१-१५ असा विजय मिळवला. अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये भारतीय जोडी पराभूत झाली. सात्विक व चिराग यांच्या खेळामध्ये नेहमी दिसणारी आक्रमकता उपांत्य सामन्यात दिसली नाही. प्रतिस्पर्ध्यांनी पहिला गेम २१-१० असा सहज जिंकून सामन्यात आघाडी घेतल्यानंतरही सात्विक-चिराग यांनी बरोबरी साधण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. (Malaysia Open)
सात्विक-चिराग यांच्या खेळातील या ढिलाईचा प्रतिस्पर्ध्यांनी मात्र पुरेपूर फायदा घेतला. दुसरा गेम २१-१५ असा जिंकून दक्षिण कोरियाच्या जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केले. पुरुष एकेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी या गटांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंना उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच पराभूत व्हावे लागले होते. (Malaysia Open)
हेही वाचा :