नवी दिल्ली : इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी ‘ओएलए’ इलेक्ट्रिकशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदी होऊ शकते. त्यात काम करणाऱ्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
ओला इलेक्ट्रिक कंपनी पुनर्रचना मोहिमेचा भाग म्हणून ही पावले उचलणार असून कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले. भावेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपला ‘आयपीओ’ नुकताच लॉन्च करून शेअर बाजारात प्रवेश केला आहे. पुनर्रचना प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली आहे. एका अहवालानुसार, या मोहिमेचा परिणाम मोठ्या टाळेबंदीच्या (ओएलए लेऑफ) स्वरूपात दिसू शकतो आणि कंपनी तिच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १२ टक्क्यांहून अधिक लोकांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते.
अहवालात म्हटले आहे, की सध्या कंपनीमध्ये सुमारे चार हजार कर्मचारी काम करत आहेत आणि कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या लोकांवर कामावरून कमी झाल्याचा परिणाम दिसून येतो. १२ टक्क्यांवर नजर टाकली, तर ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर छाटणीची टांगती तलवार आहे. ‘ओएलए’ इलेक्ट्रिकमधील पुनर्रचना प्रक्रिया डिसेंबर २०२४ मध्ये समाप्त होण्याची अपेक्षा आहे. ‘ओला इलेक्ट्रिक’ने २०२२ मध्येदेखील असेच पाऊल उचलले होते. ‘ईव्ही’मधील तक्रारींनंतर केंद्राने ‘ओला’ला नोटीस पाठववून १५ दिवसांत उत्तर मागवले आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच सप्टेंबरच्या ‘ओला इलेक्ट्रिक’ने जाहीर केलेल्या निकालांनुसार, या तिमाहीत कंपनीचा महसूल ३८.५ टक्के वाढीसह १२४० कोटी रुपये झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत डिलिव्हरीमध्ये ७३.६ टक्के वाढ झाली आहे आणि दरवर्षी ५६,८१३ युनिट्सवरून ९८,६१९ युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे.