सतीश घाटगे : कोल्हापूर
गेल्या दोन ते तीन वर्षांत व्हेल माशाची कोट्यवधी रुपये किमतीची उलटी जप्त केली, अशा बातम्या झळकू लागल्या आहेत. उलटी हा किळसवाणा प्रकार. बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना अनेकांना उलटी होते. इतरांना उलटी झाली की, आपल्यालाही मळमळू लागते. असे असताना व्हेल माशाच्या उलटीला कोटींची किंमत कशी?, ती कशी असते?, या उलटीचा वापर कशासाठी करतात? समुद्रात व्हेल माशाची उलटी वाहून जात का नाही? असे अनेक प्रश्न पडतात. या व्हेल माशाच्या उलटीविषयी जाणून घेऊ.
व्हेल स्पर्म मासा
व्हेल माशाला मराठीत देवमासाही म्हणले जाते. व्हेल माशांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा अनेक प्रजाती आहेत. तो सस्तन प्राणी आहे. तो पिलांना जन्म देतो. दूध पाजतो. त्यांचे समुद्रात पालनपोषण करतो. या प्रजातींपैकी स्पर्म व्हेल हा मांसाहारी आहे. सर्वांत मोठा दात असलेला शिकारी अशी त्याची ओळख आहे. त्यांचे दात शंकूच्या आकाराचे असतात. कोळंबी मासा त्याचा आवडता मासा आहे. व्हेल खोल समुद्रात असतात. सुमारे नव्वद मिनिटे पाण्याखाली राहतो. श्वास घेण्यासाठी तो समुद्राच्या पृष्ठभागावरही येतो. स्पर्म व्हेल कधी भारतात दिसत नव्हता. पण दहा-पंधरा वर्षांपूर्वी पूर्व आशियात त्सुनामी आल्यानंतर त्यांचा वावर भारतीय समुद्रात दिसू लागला आहे.
व्हेल माशाची उलटी
स्पर्म व्हेल माशाच्या उलटीला ‘अम्बरग्रीस’ म्हटले जाते. अम्बरग्रीस काळपट, राखाडी रंगाची असते. स्पर्म व्हेल दिवसभर अनेक गोष्टी खातो. त्यामध्ये छोटे मोठे मासे असतात. माशांची हाडे खाल्यानंतर जेव्हा त्या गोष्टी व्हेल पचवू शकत नाही, तेव्हा तो ते उलटीच्या स्वरूपात बाहेर काढतो. त्या उलटीला अम्बरग्रीस, असे म्हणतात. ही उलटी समुद्राच्या पृष्टभागावर येते. त्यावर हवा, पाण्याचा परिणाम होऊन उलटीचे रुपांतर मेणापासून तयार झालेल्या दगडासारख्या पदार्थात होते. हा पदार्थ पाण्याच्या पृष्ठभागाभोवती तरंगतो. काही वेळा किनाऱ्यावरही दिसून येतो. या उलटीला युरोपमधील अभ्यासक ‘व्हेल माशाचे शेण’ असेही म्हणतात. भारतात खोलवर समुद्रात स्पर्म व्हेल माशाचा वावर असल्याने मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांचे उलटीवर लक्ष असते. व्हेल माशाच्या उलटीला बाजारात मोठी किंमत आहे. व्हेल माशाच्या एक किलो उलटीची किंमत एक कोटी रुपये असते असे पोलिसांचे म्हणणे आहे.
व्हेल माशाची उलटी कशी ओळखतात?
सम्रुदावर शेवाळासारखा पदार्थ तरंगताना दिसला की मच्छिमार व्हेल माशाची उलटी आहे का? या याची खातरजमा करतात. स्पर्म व्हेलने माशाची शिकार केल्यानंतर प्राण्याचे अवयव, दात, टोकदार भाग उलटीच्या माध्यमातून काढतो. ही, उलटी मेणाच्या दगडासारखी असते. उलटीमध्ये कवचासारखा टोकदार भाग, काटे आढळून येतात. मेणासारखी मऊ पण टणक झालेल्या व्हेल माशाच्या उलटीत गरम चाकू, सुई, सुरी खुपसल्यास तो गोळा वितळतो. त्यातून काळ्या रंगाचा धूर येतो. व्हेल माशाच्या उलटीची खातरजमा मात्र प्रयोगशाळेतच करावी लागते.
स्पर्म व्हेलच्या उलटीचा वापर कशात करतात
परफ्युम उद्योगात स्पर्म व्हेल उलटीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. उलटीचा वापर केल्याने परफ्यूम उंची दर्जाचे होते. हवेच्या संपर्कात आल्यानंतर यातून विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो, असे तज्ज्ञ सांगतात. व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग परफ्यूम सुगंधित आणि दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. उदबत्ती आणि धूप तयार करतानाही उलटीचा वापर केला जातो. त्यामुळे या उलटीला अरब देशात आणि युरोपात मोठी मागणी आहे. मद्य आणि सिगारेटमध्येही उलटीचा वापर केला जातो. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा सम्रुदकिनारा लाभला आहे. खोल समुद्रात तर कधी किनाऱ्यालाही स्पर्म व्हेलची उलटी मिळते. काही मच्छिमार व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत सहभागी असतात. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात.
व्हेल माशाच्या उलटीत बनावटगिरी ?
‘व्हेल माशाची दहा कोटी रुपयांची उलटी जप्त,’ अशा आशयाच्या बातम्या वृत्तपत्रातून येतात. पोलिस संशयितांना अटक करतात. पण ती खरोखरच व्हेल माशाची उलटी आहे की नाही याची खातरजमा पोलिस करतात का? समुद्रात अनेक पदार्थ वाहून येत असतात. खनिज तेलाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांना गळती लागते. त्यामुळे तेल समुद्रावर तरंगते. त्याला ऑईल केक म्हणतात. ऑईल केकवर शेवाळ साचून व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हेलच्या उलटीची प्रयोगशाळेत तपासणी होण्याची गरज असते. पण पोलिसांकडून तपासणी न करता व्हेल माशाची तीन कोटी किंमतीची उलटी जप्त अशा सनसनाटी निर्माण करणाऱ्या बातम्या दिल्या जातात. आज अखेर झालेल्या कारवाईचा निकाल काय लागला, याचे मात्र उत्तर मिळत नाही.
कारवाईचा अधिकार वनखात्याला
१९७२ च्या कायद्यानुसार जंगली प्राणी, सस्तन प्राणी यांचे अवशेष, हाडे, त्याचे मृतदेह सापडले तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार वनखात्याचा आहे. पण व्हेल माशाची उलटी जप्त केल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून वन खात्याकडे साधी विचारणाही होत नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. वन विभागाकडे पोलिसांप्रमाणे मोठी यंत्रणा नसल्याने आणि खबऱ्याचे जाळे नसल्याने पोलिस व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यावर कारवाई करत असल्याचे सार्वत्रिक चित्र पहायला मिळते.
व्हेल माशाची उलटी खरी आहे का याची खातरजमा प्रयोगशाळेतून करुन घेण्याची गरज आहे. व्हेल माशाच्या उलटीला मोठी किंमत असल्याने मोठी तस्करी होत असते. स्पर्म व्हेल हा भारतात गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून आढळून येत आहे. तो समुद्र किनाऱ्यावर दिसून येत नाही. स्पर्म व्हेल हा शिकारी असल्याने त्याचा वावर हा समुद्र किनाऱ्यापासून खूप आत खोलवर असतो.
प्रा. नागेश दफ्तरदार, वाईल्ड लाईफ वॉर्डन, वनविभाग सिंधुदुर्ग