कोल्हापूर; प्रतिनिधी : हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या महान भारत केसरी सिकंदर शेखने इजिप्तच्या अहमद तौफिकला घिस्सा डावावर चितपट करत वारणेच्या कुस्ती मैदानात जनसुराज्य शक्ती चा किताब पटकावला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने इजिप्तच्या सल्लाउद्दीन अब्बलला नाकपटी डावावर आस्मान दाखवत वारणा साखर शक्तीचा बहुमान पटकावला. (Warna Kusti 2024)
वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या ३० व्या स्मृतीदिनानिमित वारणा विद्यालयाच्या मैदानावर भारत विरुध्द इजिप्त आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.
जनसुराज्य शक्ती किताबासाठी सिकंदर शेख आणि अहमद तौफिक यांच्यात कडवी झुंज झाली. सलामी झडल्यावर सिकंदरने चढाई करत तौफिकवर ताबा मिळवला. पण त्याच्या तावडीत तौफीक निसटला. दोघे मल्ल एकमेकांचा अंदाज ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते. सहाव्या मिनिटाला सिंकदरने तौफिकवर निर्णायक ताबा मिळवत घिस्सा डावावर चितपट केले. यावेळी कुस्तीशौकिनांनी जल्लोष करत मैदान डोक्यावर घेतले. सिकंदरला आमदार विनय कोरे आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते जनसुराज्य शक्ती चा किताब देण्यात आला.
वारणा साखर शक्ती किताबासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि इजिप्तचा जागतिक विजेता मल्ल सल्लाउद्दीन अब्बास यांच्यात काटाजोड लढत झाली. सव्वासहा फूट उंचीचा पैलवान सल्लाउद्दीन धिप्पाड होता. तर त्यामानाने पृथ्वीराज कमी उंचीचा असूनही त्याने कडवी लढत दिली. पृथ्वीराजने अनेकवेळा अब्बासचा ताबा घेत त्याला जेरीस आणले. १६ व्या मिनिटाला पृथ्वीराजने निर्णायक कुस्ती खेळत अब्बासचा ताबा मिळविला. पृथ्वीराजने नाकपटी घिस्सा डावावर अब्बासला आस्मान दाखवले. वारणा दूध शक्ती किताबासाठी झालेल्या लढतीत भुपेंद्र अजनाळेने शैलेश शेळकेला सहाव्या मिनिटात एकेरी पट काढून घुटना डावावर चितपट केले. दिल्लीच्या दिनेश गुलियाने उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकरला एकेरी पटावर मात वारणा बँक शक्तीचा मान पटकावला. तब्बल २८ मिनिटे ही कुस्ती चालली. (Warna Kusti 2024)
वारणा दूध सहकारी वाहतूक शक्ती किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या दादा शेळकेने हरियाणाच्या मनजीत खत्रीला घिस्सा डावावर आस्मान दाखवले. पुण्याच्या रवी चव्हाण याने दिल्लीच्या प्रविण चहरला आठव्या मिनिटाला झोळी डावावर चितपट करुन वारणा ऊस वाहतूक शक्ती किताब पटकावला. दिल्लीच्या जॉटी भाटियाने कर्नाटकच्या कार्तिक काटेला घिस्सा डावावर मात करत वारणा बिलट्यूब शक्तीचा मान मिळविला. वारणा बझार व वारणा महिला शक्ती किताबासाठी झालेल्या लढतीत समीर शेखने मुन्ना ला दुहेरी पटावर विजय मिळविला. ईडीएफ मान शक्तीसाठी झालेल्या लढतीत वारणेच्या नामदेव केसरेने उत्तरप्रदेशच्या अमित केसरेला एकेरी पटावर मात केली. गंगावेशच्या कालिचरण सोलनकरने टेंभूर्णीच्या सतपाल सोनटक्केला घिस्सा डावावर मात करत वारणा नवशक्तीचा किताब मिळविला.
हेही वाचा :