मुंबई : पालघर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील नेते अशोक धोंडी यांचा मृतदेह शुक्रवारी (दि. ३१ जानेवारी) मिळाला. बारा दिवसांपूर्वी त्यांचे अपहरण झाले होते. गुजरातमधील भिलाड गावातील एका बंद दगडखाणीत त्यांची कार आढळून आली. त्यामध्ये धोंडी यांचा मृतदेह मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. (Ashok dhondi murder)
‘दृष्यम’ सिनेमातील दृश्यासारखी हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. मृतदेह त्यांच्या ब्रिझा कारच्या डिकीमध्ये घातला. ती दगड खाणीत ढकलून देण्यात आली. धोंडी यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार त्यांचा सख्खा भाऊ अविनाश धोंडी आहे. तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला आहे. दारू तस्करीच्या वादातून हे हत्याकांड घडले. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.(Ashok dhondi murder)
धोंडी हे शिंदे गटाचे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक होते. २० जानेवारीला त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी फिर्याद दिली होती. मात्र तेव्हापासून त्यांना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नव्हते. शुक्रवारी गुजरातमधील भिलाड जवळील सरिग्राम मालफलिया येथे एका बंद दगड खाणीत अशोक धोडी यांची लाल रंगाची कार पाण्यात तरंगताना आढळली.
स्थानिक पोलिसांनी याबाबत पालघर पोलिसांना कळविले. घटनास्थळी तातडीने पथक रवाना झाले. क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. त्याच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला. गाडीत एक काळ्या रंगाचं जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचे मोबाईल इयरफोनही सापडले.
या प्रकरणी पोलिसांनी विशाल गोरात, रवींद्र मोरगा, सतीश दुमाडा आणि संतोष धिंडे यांना अटक केली होती. चौघांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. या चारही आरोपींचा धोडी यांच्या अपहरण व हत्येत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Ashok dhondi murder)
भाऊच मुख्य सूत्रधार
धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश याने धोंडी यांची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दारु तस्करीत अडसर ठरत असल्याच्या कारणातून अशोक धोंडी यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अविनाशलाही ताब्यात घेतले होते. मात्र तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेला.
हेही वाचा :