- विजय चोरमारे
सुन लो कान फाड़ के मीडिया वालो ।। 50 million की आबादी है हमारे followers की मीडिया वालो । जिस दिन हमने इशारा किया, तो उनमें से केवल 10 प्रतिशत ही, ठोकने के लिए तैयार बैठें हैं ।
ही धमकी कुणी ऐ-यागै-यानं नव्हे, तर दस्तुरखुद्द या शतकातला महानायक अमिताभ बच्चन यांनी माध्यमांना दिलीय. गेले दोन दिवस अमिताभ यांच्यासंदर्भात जे काही सुरू आहे, त्यावरून एक प्रश्न मनात आल्यावाचून राहात नाही, अमिताभ बच्चन को गुस्सा क्यूं आता है….
नेमकं प्रकरण काय आहे?
सगळं प्रकरण नीट समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला घटनाक्रम समजून घ्यावा लागेल. म्हणजे क्रोनॉलॉजी समजून घ्यावी लागेल.
अमिताभ बच्चन यांची दर रविवारी मुंबईतील जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. एक नोव्हेंबरच्या भेटीत मात्र ते नेहमीप्रमाणे थेट चाहत्यांसमोर आले नाहीत. तर एका काचेच्या सुरक्षा कक्षातून चाहत्यांना अभिवादन करताना दिसले. म्हणजे बुलेटप्रूफ काचेतून. मुलगा अभिषेक बच्चनही त्यांच्यासोबत होता. त्यांच्या या बदललेल्या भेटीच्या स्वरुपाच्या आणि सुरक्षाव्यवस्थेच्या बातम्या बनणं स्वाभाविक होतं. अलीकडंच अमिताभ बच्चन यांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली होती, किंवा नवी व्यवस्था करण्यात आली होती.
अमिताभ यांची पोस्ट काय आहे?
यानंतर अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर एक पोस्ट लिहिली.
दोन नोव्हेंबरला पहाटे दोन वाजून ३९ मिनिटांनी त्यांनी एक पोस्ट लिहिली- लिखते है प्रार्थना, और मीडिया उसके शब्दोंका दुरुपयोग करके, निरादर करता है. इतनी लाचारी??? अब मीडिया हमारे हाथ में भी है. सोच लो. भारी पडेगा.
त्यानंतर सव्वा तासाने म्हणजे पहाटे ३ वाजून ५३ मिनिटांनी त्यांनी एक सविस्तर पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी सरळसरळ माध्यमांना धमकी दिली आहे. ती पोस्ट जशीच्या तशी हिंदीत काय आहे, ते बघूया.
कृष्ण कन्हैया के लिए, प्रार्थना स्वरूप, अक्सर उचारण करते है – ” हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की “
और मीडिया उसका निरादर करके, अपना प्रचार करने के लिए, छापता है, ‘देखिए ये अमिताभ अपने विरोधियों को चुनौती दे रहा है, की, ‘ले आओ हाथी घोड़ा ‘ हम अपने हथियारों से लड़ेंगे, डरेंगे नहीं !’
एक तो घोर निंदा एक ‘जय श्री कृष्ण ‘ के उपलक्ष्य में, और दूसरा, शब्दों को पलट कर विरोधियों को चुनौती देने की बात कर रहे है ।।
सुन लो कान फाड़ के मीडिया वालो ।। 50 million की आबादी है हमारे followers की मीडिया वालो । जिस दिन हमने इशरा किया, तो उनमें से केवल 10 प्रतिशत ही, ठोकने के लिए तैयार बैठें हैं ।
तुम जितनी हमारे शब्दों की उलट पलट करके निंदा करोगे, उससे १०० गुना ज़ादा करने की क्षमता हमारे फॉलोअर्स के पास पड़ी है । ।। बस बोलने की देरी है उन्हें ।।
ये देखिए मीडिया क्या छापता है :
“अमिताभ बच्चन ने विरोधियों की धमकी पर कसा तंज, क्रिप्टिक पोस्ट लिखकर निकाली भड़ास- ‘जाओ, ले आओ अपने हाथी घोड़े’
News18 Hindi “
ये देखा आपने – धर्म का निरादर, और
बेतुका (Betuka) – Absurd, nonsensical, or silly.
हास्यास्पद (Hasyaspad) – Ridiculous or laughable (invoking derision).
असंगत
ये वो हैं जिन्हें देश का 5th Column माना जाता है – 4 column तो हमारे संस्कारों में माना जाता है, आदर सम्मान के साथ ।। एक छटा इस लिए कहा जाता है, क्यूँकि उन्हें देशवासियों की और से सम्मानित, और एक समाज में आदार रूपी दर्जा दिया जाता है !!
सम्मान ???
इससे बड़ा हासपद नहीं हो सकता … .
हमसे कोई ग़लती हो जाए – ग़लतियाँ हो जाती हैं – तो हम तुरंत क्षमा माँगते हैं, और सुधार करने का प्रयत्न करते हैं ..
पर यहाँ लगता है उनका ये जन्म साइ धिकार है …
मैं कहने वाला था एक पीड़ित व्यक्ति का, स्नेह प्यार, जा रहा हूँ निद्रा के लिए
लेकिन पीड़ित नहीं कहूँगा – अपनी पीड़ा का अधिकार केवल मेरा है – वो आपके { मीडिया ] लायक़ नहीं है …
फॉलोअर्सच्या संख्येचा अहंकार
म्हणजे आमच्याबद्दल लिहिणे बंद केलंत तरी हरकत नाही. आमचं वर्तमानपत्र आता इथंच चालतं. तुम्ही निंदा केलीत, तर माझी तुमच्यापेक्षा शंभर पट अधिक क्षमता आहे. या विधानातून त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फॉलोअर्सच्या संख्येचा अहंकार दिसून येतो.
पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिले :
जाओ! ले आओ अपने हाथी घोड़े… हम भी ले आएंगे! हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की!
याच वाक्यामुळे पुढील वाद निर्माण झाला.
News18 Hindi ने त्यांच्या या विधानाचा संदर्भ घेत बातमी प्रसिद्ध केली. त्या बातमीचा मथळा होता :
‘अमिताभ बच्चन ने विरोधियों की धमकी पर कसा तंज, क्रिप्टिक पोस्ट लिखकर निकाली भड़ास- जाओ, ले आओ अपने हाथी घोड़े’
अमिताभ यांचा आक्षेप याच मथळ्यावर आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की’ ही कृष्णभक्तीतील पारंपरिक घोषणा आहे. त्यांनी हे वाक्य भक्तिभावाने वापरलं होतं. परंतु माध्यमांनी त्यातील ‘हत्ती-घोडे घेऊन या’ या शब्दांना वेगळा अर्थ दिला आणि त्यातून विरोधकांना आव्हान दिल्याची बातमी तयार केली.
तीन महत्त्वाचे मुद्दे
अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टमध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत.
पहिला – माध्यमांनी शब्दांचा विपर्यास केल्याचा आरोप.
एखाद्या व्यक्तीच्या विधानाचा मूळ संदर्भ न देता त्यातील काही शब्द उचलून सनसनाटी मथळा तयार केला जातो, अशी त्यांची तक्रार आहे.
दुसरा – माध्यमांच्या प्रभावाला सोशल मीडियाचं आव्हान.
ते म्हणतात की आमचे ५० मिलियन फॉलोअर्स आहेत. मी इशारा केला तर त्यापैकी १० टक्के लोकही तुम्हाला ठोकून काढण्यासाठी पुरेसे आहेत.
तिसरा – माध्यमांच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न.
आपल्याकडून चूक झाली तर आपण क्षमा मागतो आणि सुधारणा करतो. पण माध्यमे मात्र आपली चूक मान्य करायला तयार नसतात, असा त्यांचा आरोप आहे.
याच संदर्भात त्यांनी माध्यमांना ‘देशाचा पाचवा स्तंभ’ (Fifth Column) असं संबोधलंय. हा शब्दप्रयोगही उपरोधिक आहे.
ठोकून काढण्याची भाषा
या पोस्टमधील सर्वाधिक लक्षवेधी भाग धार्मिक घोषणेचा नाही, तर हा आहे :
‘५० मिलियनची आबादी है हमारे followers की… जिस दिन हमने इशारा किया, तो उनमें से केवल १० प्रतिशत ही ठोकने के लिए तैयार बैठे हैं.’
५० दशलक्ष फॉलोअर्सपैकी १० टक्के म्हणजे ५० लाख लोक.
इथे अमिताभ केवळ आपल्या लोकप्रियतेचा उल्लेख करत नाहीत. ‘ठोकने के लिए तैयार’ आणि ‘बस बोलने की देरी है’ या शब्दांतून ते आपल्या फॉलोअर्सच्या सामूहिक शक्तीचा इशारा देताना दिसतात. म्हणजे हा महानायक किती बिथरलाय हे लक्षात येऊ शकतं.
अमिताभ यांनी माध्यमांना ‘Fifth Column’ म्हटले आहे. या शब्दाचा रूढ अर्थ ‘पाचवा स्तंभ’ असा सरळ नाही. एखाद्या देशाच्या किंवा व्यवस्थेच्या आत राहून तिच्या विरोधात काम करणारा गट, असा त्याचा ऐतिहासिक अर्थ आहे. तर लोकशाहीत प्रसारमाध्यमांना सामान्यतः ‘Fourth Estate’ म्हणजेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं.
त्यामुळे अमिताभ यांचा ‘Fifth Column’ हा शब्दप्रयोग उपरोधिक असला, तरी त्यात माध्यमांविषयीचा अविश्वास आणि त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजी दिसते.
या घटनेत दोन स्वतंत्र प्रश्न आहेत.
एक म्हणजे माध्यमांची जबाबदारी.
एखाद्या व्यक्तीचं विधान प्रसिद्ध करताना त्याचा संदर्भ तपासणे आवश्यक आहे. मात्र क्लिकबेट्सच्या आहारी जाऊन मथळा आकर्षक करण्याच्या नादात मूळ विधानाचा अर्थ बदलला जातो. त्यातून संबंधित व्यक्तिविषयी गैरसमज होतात आणि वाचकांची फसवणूकही होत असते.
दुसरा म्हणजे सेलिब्रिटींची जबाबदारी.
माध्यमांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. स्वतःचे डिजिटल व्यासपीठ उभारून आपली बाजू मांडण्याचाही अधिकार आहे. पण लाखो लोकांच्या अनुयायित्वाचा उल्लेख करून अमिताभसारखा नट ‘इशारा दिल्यावर ठोकायला तयार’ असल्याचे सांगतात. यावरून ते किती बिथरलेत हे लक्षात येतं.
धमक्यांना घाबरून बुलेटप्रूफ काचेतून चाहत्यांसमोर येणारा महानायक माध्यमांना मात्र धमक्या देतो, यातली विसंगतीही लपून राहात नाही.
हा केवळ एका अभिनेत्याचा माध्यमांशी झालेला संघर्ष नाही. हा पारंपरिक प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया यांच्यातील बदलत्या सत्तासंबंधांचाही नमुना आहे.
अमिताभ यांची संधिसाधू भूमिका
आता या प्रकरणाच्या पलीकडं जाऊन अमिताभ बच्चन यांच्या एक्सवरील व्यवहाराचीही चर्चा करूया. या महानायकाला एक्सवर म्हणजे पूर्वीच्या ट्विटरवर वारंवार ट्रोल केलं जातं. त्याचं कारण त्याची संधिसाधू भूमिका. सत्तेला घाबरून मौन पाळण्याचा भेकडपणा. गेल्या काही वर्षांत त्यांच्या राजकीय भूमिकेतील कथित बदल, सामाजिक प्रश्नांवरील मौन यावरून त्यांना त्यांच्या जुन्या ट्विट्सची आठवण करून दिली जाते.
अमिताभ बच्चन यांच्यासंदर्भात वारंवार चर्चेत येणारा मुद्दा म्हणजे पेट्रोल-डिझेल दरांवरील त्यांची जुनी ट्विट्स.
२०१२ मध्ये केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीवर अमिताभ यांनी उपरोधिक ट्विट्स केले होते.
त्यातील एक प्रसिद्ध उपरोधिक विधान होतं : ‘रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, गाड़ी खरीदोगे कैश में, पेट्रोल लाओगे उधार में।’
मात्र २०२१ मध्ये पेट्रोलचे दर अनेक शहरांत १०० रुपयांच्या पुढे गेल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने त्यांचं जुनं ट्विट्स पुन्हा समोर आणलं. अनेकांनी त्यांना प्रश्न विचारला की, यूपीए सरकारच्या काळात इंधन दरवाढीवर बोलणारे अमिताभ आता पेट्रोल दरवाढीवर गप्प का?
शेतकरी आंदोलनातही संदिग्ध भूमिका
शेतकरी आंदोलनाच्यावेळची त्यांची संदिग्ध भूमिकाही चर्चेत होती.
२०२०-२१ मध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू होते.
२ फेब्रुवारी २०२१ रोजी अमिताभ यांनी एक ट्विट केले : ‘झूठे इंसान की ऊंची आवाज सच्चे इंसान को खामोश करा देती है। लेकिन सच्चे इंसान की खामोशी झूठे इंसान की बुनियाद हिला देती है।’
या ट्विटचा शेतकरी आंदोलनाशी थेट संबंध त्यांनी स्पष्ट केला नव्हता. मात्र रिहानाने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर अमिताभ यांच्या या विधानाचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावण्यात आला. काहींनी त्यांना शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बोलण्याचे आवाहन केले, तर काहींनी त्यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांचं स्पष्ट बोलण्याचं धाडस झालं नाही.
निर्भया प्रकरणातील भूमिका आणि आजचं मौनही वारंवार चर्चेत येतं. २०१२ मधील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर दिल्लीत मोठे आंदोलन झालं होतं. त्यावेळी अमिताभ यांनी पोलिसांकडून शांततापूर्ण आंदोलकांवर अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
जुलै २०२६ मध्ये शशी थरूर यांनी अमिताभ यांचे हे जुने ट्विट पुन्हा शेअर केले. त्यावेळी जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या संदर्भात अमिताभ सध्याच्या घडामोडींवर का बोलत नाहीत, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला.
पहलगाम हल्ल्यावेळीही मौन
एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर अनेक चित्रपट कलाकारांनी निषेध व्यक्त केला आणि पीडितांप्रति सहवेदना व्यक्त केल्या. त्याच काळात अमिताभ यांनी X वर केवळ ‘T 5356 -‘ अशी पोस्ट केली. स्पष्ट बोलणं टाळलं.
मार्च २०२० मध्ये अमिताभ यांनी सोशल मीडियावर अमावास्येच्या दिवशी टाळ्या, शंखनाद आणि ध्वनीलहरींमुळे विषाणूंची शक्ती कमी होते, अशा स्वरूपाचा संदेश प्रसारित केला होता. वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा असलेल्या या संदेशावर अनेकांनी टीका केली. त्यानंतर त्यांनी संबंधित पोस्ट डिलीट केली.