-जमीर काझी
मुंबई : मुंबई महानगर वगळता उर्वरित राज्यातील एखाद्या विभागाइतका विस्तीर्ण असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार ज्या पक्षाला साथ देतात, तो राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचतो, तसेच मुंबई महापालिकेवरही त्यांचाच वरचष्मा राहतो, असा आतापर्यंतचा इतिहास आहे, त्यामुळे तब्बल २६ आमदार निवडून देणाऱ्या या जिल्ह्यातून आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांकडून निकराचे प्रयत्न केले जात आहेत.
उपनगरातील २६ मतदारसंघांमधून एकूण ३१५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये महायुतीतील घटक पक्षात मिठाचा खडा बनलेले नवाब मलिक, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले झिशान सिद्दिकी, उध्दव ठाकरे यांचे भाचे वरूण सरदेसाई, नसीम खान, राज्यातील सर्वात धनाढ्य उमेदवार पराग शाह, राम कदम, संजय निरुपम आदी दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. बंडखोरीचा सामना सर्वच पक्षांना करावा लागत आहे. त्यामुळे लढतींचे चित्र स्पष्ट होत नाही.
वांद्रे पूर्व: सहानुभूतीची लाट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात राज्याचा सत्ताबाह्य रिमोट कंट्रोल असलेल्या मातोश्री निवासस्थानाचा समावेश असलेला हा मतदारसंघ माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे देशभरात चर्चेत आला आहे. मुस्लिम समाजाची निर्णायक मते असलेल्या याठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या झिशान सिद्दीकी यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट त्यांना दुसऱ्यांदा सभागृहात पोहचवेल, अशी शक्यता आहे. ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई त्यांना कसे रोखतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. मनसेने अखेरच्या दिवशी ठाकरे गटातून आलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी देऊन मराठी मतदारांसाठी पर्याय दिला आहे
वांद्रे पश्चिम: शेलारांच्या संपर्काचा प्रभाव
याठिकाणी आशिष शेलार यांच्यासमोर काँग्रेसच्या असीफ झकेरिया यांचे आव्हान आहे. गेल्यावेळीही या दोघांतच लढत झाली होती आणि शेलार मोठ्या फरकाने निवडून आले होते. आशिष शेलार मतदारसंघात सतत कार्यरत असतात, त्या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवाराचे अस्तित्व दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत वारे उलटे वाहत असतानाही शेलार यांनी येथून उज्ज्वल निकम यांना आघाडी दिली होती. मात्र इथल्या सामाजिक समीकरणांमुळे काँग्रेसला चांगली साथ मिळते. बसपाचे अजीज कुरेशी यांना किती मते मिळतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
मानखुर्द शिवाजीनगरमध्ये महायुतीत दुफळी
मानखुर्द शिवाजी नगरमध्ये सपाचे अबू आझमी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपचा व शिवसेना शिंदे गटाचा विरोध असतानाही अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा प्रचारही केला. महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश पाटील, मनसेचे जगदीश खांडेकर, वंचितचे मोहम्मद शिराज शेख रिंगणात आहेत
अणुशक्तीनगरमध्ये दुरंगी लढत:
राष्ट्रवादी अजित पवार गटाने नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली असून त्याविरोधात शरद पवार गटाने अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांना उभे केले आहे. अणुशक्तीनगर का बेटा असा प्रचार ते करीत असले तरी त्यांना स्थानिकांचा कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागणार आहे. मनसेचे नवीन आचार्य हेही इथून रिंगणात आहेत.
बोरिवलीत भाजपला बंडखोरी रोखण्यात यश
भाजपने या मतदारसंघातून सुनील राणे यांचे तिकीट कापून संजय उपाध्याय या बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली. त्यामुळे नाराज असलेल्या माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी होती. मात्र भाजपा श्रेष्ठींनी डोळे वटारल्यानंतर ते थंड झाले. ठाकरे गटाचे संजय भोसले व मनसेचे कुणाल माईणकर इथे रिंगणात आहेत.
कांदिवलीत भातखळकरांची हॅट्रिक हुकणार?
कांदिवली मतदारसंघात भाजपचे अतुल भातखळकर हॅट्रिक करण्याच्या तयारीत असले तरी काँग्रेसचे कालू बुधेलिया यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. मनसेचे दिनेश साळवी कोणाची मते खातात यावर निकाल अवलंबून आहे.
मालाडमध्ये अस्लम शेख यांना कडवे आव्हान
माजी मंत्री व काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख या ठिकाणी तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये अल्पसंख्यांक समाजातील अनेकजण आहेत. त्यामुळे मतविभागणीचा फायदा शेलार यांना मिळण्याची शक्यता आहे.
दिंडोशीत निरूपम पुन्हा मैदानात
लोकसभेपूर्वी काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय निरुपम यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. मात्र ठाकरे गटाचे निष्ठावंत विद्यमान आमदार सुनील प्रभू यांच्यासमोर त्यांचा कितपत निभाव लागतो हे पाहावे लागेल. शिवाय मनसेचे भास्कर परब रिंगणात असल्याने तिरंगी लढतील प्रभू बाजी मारतील, असे सध्याचे चित्र आहे.
गोरेगावात दुरंगी लढत
हा मतदारसंघ मिळवण्यासाठी काँग्रेसने अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र ठाकरे गटाने तो सोडला नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज आहेत. ठाकरे गटाच्या समीर देसाईंना कितपत सहाय्य करतात यावरच भाजपच्या विद्या ठाकूर यांच्यासमोर त्यांचा निभाव लागणार आहे.
नसीम खान यांना परतफेडीची संधी
चांदिवलीतून काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचा गेल्या विधानसभेत ४०९ मतांनी पराभव झाला होता. शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी बाजी मारली होती. आता ते शिंदे गटातून निवडणूक लढवत असून ठाकरेंचा पाठिंबा नसीम खान यांना मिळाला आहे. त्यामुळे खान यांना पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळाली आहे. मनसेचे महेंद्र भानुशाली आणि एमआयएमचे गफर सय्यद हे निवडणूक रिंगणात आहेत.
जोगेश्वरीत वायकरांची प्रतिष्ठा पणाला
जोगेश्वरी विधानसभेतून यंदा रवींद्र वायकर खासदार बनल्याने त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे स्थानिकांत नाराजी असून त्याचा फायदा वायकर यांचे एकेकाळचे समर्थक व ठाकरे गटाचे बाळा नर कितपत घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मनसेकडून भालचंद्र अंबुरे आणि वंचितचे परमेश्वर रणशूर यांच्यासह एकूण २२ उमेदवार रिंगणात रिंगणात आहेत.
विक्रोळीत बदलाची हवा
विक्रोळी मतदारसंघात सलग दोन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार व ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांच्याबाबतही स्थानिकांमध्ये नाराजी असून त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे, मनसेचे विश्वजित ढोलम, बसपाचे हर्षवर्धन खांडेकर आणि अपक्षांसह १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
घाटकोपरमध्येही चुरस
घाटकोपर पश्चिममध्ये भाजप यावेळी राम कदम यांचा पत्ता कापणार, अशी चर्चा असताना त्यांनी तिकीट मिळवण्यात बाजी मारली. शिवसेना ठाकरे गटाचे संजय भालेराव यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. मनसेचे गणेश चुक्कल आणि वंचितचे सागर गवई ही रिंगणात आहेत. घाटकोपर पूर्व मध्ये राज्यातील धनाढ्य उमेदवार भाजपचे पराग शाह यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राखी जाधव रिंगणात आहेत. मनसेचे संदीप कुलथे, वंचितच्या सुनीता गायकवाडही रिंगणात आहेत
कलीनात पोतनीसांना भाजपचे आव्हान
या ठिकाणी ठाकरे गटाचे निष्ठावंत संजय पोतनीस यांना भापाचे अमरजीत सिंह यांचे आव्हान आहे. भाजपाने आरपीआय आठवले गटासाठी जागा सोडण्याचे सांगत आपल्या चिन्हावर त्यांचे कार्यकर्ते अमरजीत यांना उमेदवारी दिली आहे. मनसेच्या बालकृष्ण फुटके सह१६ उमेदवार रिंगणात आहेत
कुर्ल्यात शिवसैनिकांत लढाई
आरक्षित असलेल्या या मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीणा मोराजकर यांच्यात लढत होत असून या मतदारसंघात मनसेकडून प्रदीप वाघमारे आणि एमआयएमच्या आसमा शेख ही रिंगणात आहेत.
विलेपार्लेत दुरंगी लढत
या ठिकाणी भाजपाच्यावतीने तिसऱ्यांदा पराग अळवणी निवडणूक रिंगणात असून ठाकरे गटाचे संदीप नाईक यांच्याशी त्यांची लढत होत आहे. त्याशिवाय मनसेच्या जुईली झेंडे आणि वंचितचे संतोष मुरगी रिंगणात आहेत.
मुलुंडमध्ये लक्षवेधी लढत
भाजपचे विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांच्यविरोधात काँग्रेसचे राकेश शेट्टी वंचितचे प्रदीप शिरसागर रिंगणात आहेत. भांडुपमध्ये ठाकरे गटाचे विद्यमान आमदार रमेश कोरगावकर यांच्याविरोधात शिंदे गटाचे अशोक पाटील, मनसेच्या शिरीष सावंत आणि वंचितच्या स्नेहल सोहोनी रिंगणात आहेत. चेंबूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाने विद्यमान आमदार आमदार प्रकाश हातर्फेकर यांना संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून तुकाराम काते, मनसे कडून माऊली थोरवे आणि वंचितचे आनंद जाधव रिंगणात आहेत.
अंधेरी, चारकोप, दहिसर, मागाठणे…
अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे आमदार अमित साटम यांच्यासमोर काँग्रेसकडून माजी आमदार अशोक जाधव यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांचा निभाव लागणे बिकट आहे. अंधेरी पूर्व मध्ये भाजपमधून शिंदे गटात आलेल्या मुरजी पटेल यांनी ठाकरे गटाचे विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. स्थानिक विरुध्द परप्रांतीय हा मुद्दा येथे रंगला आहे. चारकोपमध्ये भाजपचे विद्यमान आमदार योगेश सागर यांच्यासमोर काँग्रेसचे यशवंत सिंग उभे आहेत. अन्य उमेदवार रिंगणात असल्याने त्याचा फटका सिंग यांना बसणार आहे.
दहिसरमध्ये भाजपच्या मनीषा चौधरी यांच्यासमोर ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. मनसेचे महेश फरकासे ही रिंगणात आहेत. मागाठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाने उदेश पाटेकर यांना संधी दिली आहे.