कोल्हापूर :प्रतिनिधी : मावळतीकडे सूर्य झुकत असताना मेबॅक वाहनातून श्रीमंत शाहू छत्रपतीसह राजघराण्यातील सदस्यांचे न्यू पॅलेसहून दसरा चौकात आगमन झाले. उपस्थित मान्यवर आणि करवीरकर जनतेने टाळ्या वाजवून राजघराण्याला सलामी दिली. करवीरगीताने पोलिस बॅन्ड पथकाने त्यांना मानवंदना दिली. सरदार, इनामदार घराण्यातील मंडळीची मुजरे झडले. मान्यवरांनी राजघराण्याचे स्वागत केले. श्रीमंत शाहू छत्रपतींनी आपट्याच्या पानाची पूजा केली आणि सोने लुटल्यावर तमाम करवीरकरांनी दसरा चौकातील लगडकोटाकडे धाव घेत शाही दसऱ्याचे सोने लुटले. (Kolhapur’s Dussehra)
कोल्हापूरच्या दसरा सोहळ्याला ऐतेहासिक महत्व आहे. राज्य सरकारने यावर्षी कोल्हापूरच्या दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. नवरात्रोत्सवाची सांगता दसरा सोहळा होणार असल्याने दसरा चौकात भव्य शमियाना थाटला होता. कोल्हापूर संस्थानाचा भगवा जरीपटका फडकत होता. लगडकोटात आपट्यांची पाने करकचून बांधून ठेवली होती. मान्यवरांना आसनव्यवस्था केली होती. सायंकाळी पाचनंतर मान्यवरांसह जनतेची पावले दसरा चौकाकडे वळू लागली. (Kolhapur’s Dussehra)
जुन्या राजवड्यात छबिन्यासह पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि पारंपरिक वेषभूषेतील मानकऱ्यांसह करवीर निवासिनी अंबाबाई, भवानी देवी, गुरुमहाराज वाड्यातील पालख्याचे दसरा चौकात आगमन झाले. त्यानंतर सर्वांच्या नजरा राजघराण्यातील सदस्यांकडे लागली होती. सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास मेबॅकसह वाहनांचा ताफा दसरा चौकात दाखल झाला. बुलेटधारी शहर वाहतूक शाखेचे पोलिसांचा ताफा अग्रभागी होता. दसरा चौकातून मेबॅक येताच शाहू छत्रपतींनी जनतेला अभिवादन केले. त्यानंतर पोलिस बँन्डच्या पथकाने करवीरगीताने मानवंदना दिली. श्रीमंत शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, यौराजे शहाजीराजे, यौराजे यशराजे यांचे मानकऱ्यांनी स्वागत केले. उपस्थित सरकार, इनामदार घराण्यातील प्रमुखांनी महाराजांना मुजरे केले. राजघराण्यातील सदस्यांनी मान्यवरांच्या अभिवादनाचा स्वीकार करत मुख्य दसरा सोहळ्यासाठी लगडकोटाकडे गेले. (Kolhapur’s Dussehra)
राजपुरोहित दार्दर्णे यांनी शमीपूजन केले. देवीची आरती झाली. शाहू छत्रपतीसह राजघराण्यातील सदस्यांनी सोने लुटले. ठासणीच्या बंदुकीच्या फैरीनी दसऱ्याचे सोने लुटल्याची वर्दी देताच करवीरकर जनतेने सोने लुटण्यासाठी लगडकोटाकडे धाव घेतली. सोने लुटल्यानंतर मेबॅक वाहनातून परत न्यू पॅलेसकडे जाताना करवीकर जनतेकडे आपट्यांया पानांचा स्वीकार करत राजघराण्यातील सदस्यांनी शुभेच्छाचा स्वीकार केला. (Kolhapur’s Dussehra)
या सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहूल आवाडे, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महानगरपालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर.के.पोवार, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी अजित पवार शहराध्यक्ष अदिल फरास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (Kolhapur’s Dussehra)