इंफाळ : भाजपने मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना हटवल्यास पक्ष आपल्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो, असे ‘एनपीपी’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष युम्नाम जॉयकुमार सिंग म्हणाले. या पक्षाने गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. दरम्यान, मणिपूरमधील प्रश्नावरून काँग्रेसने टीका केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र पाठवले असून, त्यात काँग्रेसवर टीका केली आहे. या पत्रावरून काँग्रेसने पुन्हा भाजपला धारेवर धरले आहे.
राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात बिरेन सिंग पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ‘एनपीपी’च्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला.तथापि, समर्थन मागे घेतल्याचा मणिपूर सरकारवर कोणताही परिणाम झाला नाही. कारण भाजपकडे ६० सदस्यांच्या सभागृहात ३२ आमदारांसह पूर्ण बहुमत आहे. नागा पीपल्स फ्रंट आणि संयुक्त जनता दल हेदेखील सत्ताधारी आघाडीत आहेत. गोंधळामुळे आमदार सहभागी झाले असावेत. १८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ‘एनपीपी’चे तीन आमदार उपस्थित होते. हे गोंधळामुळे असू शकते असा दावा जॉयकुमार यांनी केला. ही बैठक ‘एनडीए’च्या आमदारांसाठी होती. आम्ही फक्त बीरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे; पण आम्ही अजूनही ‘एनडीए’चे मित्र आहोत;मात्र प्रदेश किंवा राष्ट्रीय अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीशिवाय अशा बैठकांना उपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असा इशारा आम्ही आमच्या आमदारांना दिला आहे.
मणिपूरमध्ये आमदारांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यात दीड कोटी रुपयांचे दागिने लुटल्याचे उघड झाले आहे. संयुक्त जनता दलाचे आमदार के. जयकिशन सिंग यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तोडफोड करणाऱ्या जमावाने थांगमेईबंद भागातील आमदारांच्या निवासस्थानातून १८ लाखांची रोकडही लुटली. विस्थापितांसाठी ठेवलेल्या अनेक वस्तूंचीही नासधूस करण्यात आली. हिंसाचारात लॉकर्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि फर्निचरची तोडफोड करण्यात आल्याचा दावा मदत शिबिरातील स्वयंसेवक सनाय यांनी केला. जमावाने ७ गॅस सिलिंडर काढून घेतले. विस्थापितांची कागदपत्रे नष्ट करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी जमावाने आमदारांच्या निवासस्थानाची सुमारे दोन तास तोडफोड केली. आमदार त्या वेळी कुटुंबातील एका सदस्याच्या उपचारासाठी दिल्लीत होते.
मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात हिंसाचार वाढल्यानंतर संतप्त लोकांनी अनेक आमदारांच्या घरांची तोडफोड केली. जिरीबाम जिल्ह्यातील एका मदत शिबिरातून तीन महिला आणि तीन मुले बेपत्ता झाल्यानंतर हिंसाचार उसळला होता. केंद्र सरकारने अलीकडेच मणिपूरमध्ये ५० नवीन केंद्रीय राखीव सशस्त्र दलाच्या कंपन्या तैनात करण्याची घोषणा केली. दरम्यान, लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी राज्य सरकारने चार जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी संचारबंदी शिथिल केली आहे. इम्फाळ पूर्व आणि थौबलच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सकाळी ५ ते दुपारी १२ पर्यंत शिथिलता दिली होती, तर इंफाळ पश्चिम आणि बिष्णुपूर जिल्ह्यांसाठी ही शिथिलता पहाटे ५ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल. याआधी चार जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते, की संचारबंदीत शिथिलता पहाटे ५ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असेल.
नड्डा यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर काँग्रेस प्रमुख खर्गे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रावर टीका केली. राज्यात सध्या सुरू असलेल्या तणाव आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष ‘सनसनाटी’ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला. या पत्राबाबत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, की काँग्रेस राजकीय फायदा मिळवण्यासाठी आणि आपला नापाक अजेंडा पुढे नेण्यासाठी खोटी, चुकीची आणि राजकीय हेतूने प्रेरित कथा रचत आहे. त्याचवेळी नड्डा यांनी काँग्रेसवर आरोप करत सांगितले, की ईशान्येकडील राज्याने इतिहासातील सर्वात रक्तरंजित काळही त्यांच्या राजवटीत पाहिला आहे. मणिपूरमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आणखी वाढला आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारासाठी दोन्ही राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत.
काँग्रेस घेते परकीय शक्तींची मदत
नड्डा यांनी मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात खर्गे यांना पत्र लिहून म्हटले आहे, की धक्कादायक गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्ष मणिपूरमधील परिस्थिती सनसनाटी बनवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. भारताच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी काँग्रेस नेते परकीय शक्तींचा पाठिंबा घेतात आणि त्यांना प्रोत्साहन देतात हे ‘चिंताजनक’ आहे.