शिक्षणामुळे स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आणि त्यांना आसमंत खुणावू लागला. विविध क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली झाली. स्त्रियांच्या मोठ्या संख्येला शिक्षण घेण्याची संधी दिली जाऊ लागली. सध्या भारतात सर्व क्षेत्रात महिलांची कमतरता नाही. विविध कार्यालये आणि संस्थांमध्ये उच्च पदांवर असलेल्या सशक्त महिलांच्या संख्येत आता वाढ झाली आहे.
व्यवसायामध्येही त्या कमी नाहीत. अनेक महिला विविध व्यवसायांमध्ये गुंतलेल्या आहेत. तंत्रज्ञान, कायदा, प्रशासन, अध्यापन इत्यादी विविध विषयांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धा करू लागल्या आहेत. पारंपारिक व्यवसायांव्यतिरिक्त, आमच्याकडे पी.टी.उषा, सानिया मिर्झा, पी.व्ही सिंधू, मिताली राज, मेरी कोम, सायना नेहवाल, दीपा कर्माकर आणि इतर सारख्या क्रीडा क्षेत्रात भरभराट करणाऱ्या महिला नावारुपाला आल्या आहेत. ज्यांनी भारतातील अनेक महत्वाकांक्षी खेळाडूंचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यांना प्रेरणा दिली आहे. अजूनही विविध क्रीडा प्रकारात त्या चमकत आहेत.
वैद्यकीय, तांत्रिक, अध्यापन, कायदेशीर, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कलेच्या क्षेत्रातही महिला चमकू लागल्या आहेत.अशा काही महिला आहेत ज्यांनी कला आणि मनोरंजन उद्योगांवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकला आहे. इंदिरा गांधी, विजय लक्ष्मी पंडित, ॲनी बेझंट, महादेवी वर्मा, नीता अंबानी, सचेत कृपलानी, अमृता प्रीतम, सुषमा स्वराज, पद्मजा नायडू, कल्पना चावला, मदर तेरेसा, सुभद्रा कुमारी चौहान आणि इतर काही महान भारतीय महिला आहेत यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. यांच्या कर्तृत्वाने समाजातील स्त्रियांच्या स्थितीत लक्षणीय बदल केले आहेत.
पूर्वीच्या तुलनेत महिलांच्या स्थितीत सातत्याने बदल होत आहेत. लष्करी क्षेत्रे, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्र यासारख्या क्षेत्रात आजच्या महिला पूर्णपणे भाग घेतात. शिवाय, त्यांनी क्रीडा क्षेत्रातही संपूर्ण योगदान दिले आहे. आजच्या स्त्रियांना कोणतेही क्षेत्र व्यर्ज नसून त्यांनी कुटुंब आणि समाजात एक सन्माननीय स्थान व्यापले आहे.
अलिकडे भारतीय महिला असुरक्षीत वातावरणात वावरत असल्याचे जाणवते. महिलां विरोधातील गुन्हे संपवणे हे अजूनही आव्हान आहे. महिलांच्या अधिकारांमध्ये लक्षणीय प्रगती झाल्यानंतरही, बलात्कार, लैंगिक भेदभाव आणि यासारख्या विविध मार्गांनी त्यांचे शोषण, छळ आणि अत्याचार केले जात आहेत. महिलांची स्वायत्तता सुनिश्चित करून, कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात सहभाग आणि निर्णय क्षमता वाढवून आपण या असल्या गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिबंध करू शकतो.