ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघ पहिल्या डावात अडचणीत सापडला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्यानंतर भारताची अवस्था १७ षटकांमध्ये ४ बाद ५१ अशी बिकट झाली आहे. त्यामुळे, सोमवारी वारंवार आलेला पावसाचा व्यत्यय हा एकप्रकारे भारताच्या पथ्यावरच पडला. (India Test)
पावसामुळे सोमवारी एकूण केवळ ३३ षटकांचा खेळ होऊ शकला. भारताच्या डावाची सुरुवात यशस्वी जैस्वालने मिचेल स्टार्कला चौकार मारून झोकात केली. परंतु, पुढच्याच चेंडूवर मार्शकडे झेल देऊन परतला. तिसऱ्या षटकात स्टार्कने शुभमन गिललाही मार्शकरवीच झेलबाद केले. विराट कोहलीने नेहमीप्रमाणे ऑफ-स्टंपबाहेरील चेंडू कव्हर्समध्ये मारण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षकाकडे झेल दिला. हेझलवूडने त्याला बाद केले. रिषभ पंतला कमिन्सने बाद केले. एकीकडे ही पडझड सुरू असताना लोकेश राहुलने दुसऱ्या बाजूने संयमी फलंदाजी करून ६४ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या. भारताच्या डावामध्ये चारवेळा पावसाचा व्यत्यय आला. अखेर १७ षटकांनंतर आलेला पाऊस व अंधुक प्रकाश यामुळे पंचांनी दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. खेळ थांबला, तेव्हा राहुल ३३, तर रोहित शर्मा शून्य धावांवर खेळत होता. (India Test)
तत्पूर्वी, रविवारी ७ बाद ४०५ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सोमवारी पहिल्या सत्रामध्ये धावसंख्येत ४० धावांची भर घातली. दुसऱ्या दिवशी ४५ धावांवर नाबाद राहिलेल्या ॲलेक्स केरीने अर्धशतक झळकावत ८८ चेंडूंमध्ये ७ चौकार व २ षटकारांसह ७० धावा केल्या. आकाशदीपने त्याला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. भारताकडून बुमराहने सहा, तर सिराजने दोन विकेट घेतल्या. (India Test)
बुमराहचे असेही ‘अर्धशतक’
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्या डावामध्ये सहा विकेट घेण्याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बळींचे अर्धशतक पूर्ण केले. मायदेशाबाहेर एका देशामध्ये ५० कसोटी विकेट घेणारा बुमराह हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी, कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियामध्ये, तर इशांत शर्माने इंग्लंडमध्ये प्रत्येकी ५१ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा :