पहेलगाम : पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्याचे पडद्यामागील सूत्रधार शोधून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, असा सडेतोड इशारा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. या हल्ल्यानंतर राजनाथ यांनी बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. (Rajnath)
“पहेलगाममध्ये काल दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य करून विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये काही निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले. मी सर्व देशवासियांना आश्वस्त करू इच्छितो की, सरकार याप्रकरणी प्रत्येक आवश्यक पाऊल उचलणार आहे. आम्ही केवळ या हल्ल्यांच्या दोषींपर्यंतच पोहोचणार नाही, तर पडद्यामागील सूत्रधारांपर्यंतही पोहोचू. आमचे सडेतोड आणि स्पष्ट प्रत्युत्तर दोषींना लवकरच पाहायला मिळेल, याची हमी मला देशाला द्यायची आहे,” असे राजनाथ यांनी सांगितले. (Rajnath)
राजनाथ यांनी बुधवारी सुमारे अडीच तास आढावा बैठक घेतली. या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि हवाईदलप्रमुख ए. के. सिंह आदी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान द्विवेदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा स्थितीविषयी सविस्तर सादरीकरण केले. पेहेलगाममध्ये बैसरंग घाटीत मंगळवारी चौघा दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यातून सोडून भारतात परतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काश्मीरमध्ये पोहोचले असून बुधवारी मृतांच्या नातेवाईकांना भेटले.
हेही वाचा :
दहशतवाद, धर्म आणि राजकारण
दोघा दहशतवाद्यांना टिपले
अमित शहा अपयशी गृहमंत्री