तेल अवीव : वृत्तसंस्था : गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. या युद्धाची झळ लेबनॉनसह इराणपर्यंत पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा युद्धाची धार वाढताना दिसून येत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सोमवारी दक्षिण बैरूत उद्ध्वस्त झाले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यामध्ये ३१ लोक मारले गेले. या दरम्यान अमेरिकेने म्हटले आहे, की इस्रायल आणि ‘हिज्बुल्लाह’मध्ये लवकरच संघर्षविराम होऊ शकतो. यावर चर्चा सुरू असून लवकरच यातून मार्ग निघेल. इस्रायली सैन्याने काल (सोमवार) सांगितले होते, की त्यांनी लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहशी संबंधित २५ ठिकाणांना लक्ष्य केले होते. ज्यामध्ये नबातियेह, बालबेक, बेका घाट, दक्षिणी बेरूत आणि शहराच्या बाहेरील भागांचा समावेश आहे. ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये राजधानीच्या दक्षिण उपनगरांमध्ये धुराचे लोट दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्ध विरामाच्या प्रयत्नांच्या दरम्यानही या आठवड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या छापेमारीनंतर हल्ले करण्यात आले. आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की शनिवारी पहाटे मध्य बैरूतच्या दाट लोकवस्तीच्या बस्ता परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात किमान २९ लोक ठार झाले. इस्रायलने मुख्य दक्षिणेकडील शहरांच्या काही भागांसाठी इशारा दिल्यानंतर टायर आणि नाबतीह येथे इस्रायली हल्ले झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टस्मध्ये देण्यात आली आहे.