बडोदा : प्रतिका रावल व तेजल हसबनीस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने आर्यलंडविरुद्धचा वन-डे सामना ६ विकेटनी जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (Women’s Cricket)
विजयासाठी २३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी भारताला दहा षटकांत ७० धावांची सलामी दिली. विशेषत: स्मृतीने वेगवान खेळ करत २९ चेंडूंमध्ये ६ चौकार व एका षटकारासह ४१ धावा केल्या. स्मृती बाद झाल्यानंतर हरलीन देओल व जेमिमा रॉड्रिग्ज या मोठी खेळी करू शकल्या नाहीत. एकविसाव्या षटकात भारताच्या ३ बाद ११६ धावा झाल्या होत्या. त्यानंतर, मात्र प्रतिका आणि तेजल यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत भारताचा विजय सुकर केला. चौतिसाव्या षटकात सलग दोन चौकार व एक षटकार मारल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात प्रतिका बाद झाली. तिने ९६ चेंडूंमध्ये १० चौकार व एका षटकारासह ८९ धावांची खेळी केली. कारकिर्दीतील पहिलेवहिले वन-डे अर्धशतक झळकावणारी तेजल ४६ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिली. ३५ व्या षटकात रिचा घोषने चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आयर्लंडतर्फे एमी मॅग्वायरने ३ विकेट घेतल्या. (Women’s Cricket)
तत्पूर्वी, आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २३८ धावांपर्यंत मजल मारली. आयर्लंडकडून कर्णधार गॅबी लुइसने सर्वाधिक ९२ धावा केल्या. या खेळीत तिने १५ चौकार लगावले. लिए पॉलने ७३ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ५९ धावा करून तिला उपयुक्त साथ दिली. भारताकडून प्रिया मिश्राने २ विकेट घेतल्या. या मालिकेतील दुसरा सामना १२ जानेवारीला रंगणार आहे. (Women’s Cricket)
स्मृतीचा ४००० धावांचा टप्पा पूर्ण
या सामन्यातील खेळीदरम्यान भारताची कर्णधार स्मृती मानधनाने वन-डे कारकिर्दीतील ४,००० धावांचा टप्पा पूर्ण केला. तिने आता ९५ सामन्यांमध्ये ४००१ धावा केल्या आहेत. भारतातर्फे वन-डेत चार हजार धावा करणारी ती मिताली राजनंतरची दुसरीच महिला क्रिकेटपटू ठरली. त्याचप्रमाणे, सर्वांत कमी डावांमध्ये हा टप्पा ओलांडणाऱ्या महिला फलंदाजांमध्ये ती तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क यांनी सर्वांत वेगवान ८६ डावांमध्ये, तर ऑस्ट्रेलियाच्याच मेग लॅनिंगने ८९ डावांत ४,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
संक्षिप्त धावफलक : आयर्लंड – ५० षटकांत ७ बाद २३८ (गॅबी लुइस ९२, लिएह पॉल ५९, आर्लिन केली २८, प्रिया मिश्रा २-५६, दीप्ती शर्मा १-४१) पराभूत विरुद्ध भारत – ३४.३ षटकांत ४ बाद २४१ (प्रतिका रावल ८९, तेजल हसबनीस नाबाद ५३, स्मृती मानधना ४१, एमी मॅग्वायर ३-५७, फ्रेया सार्जंट १-३८).
𝗠𝗶𝗹𝗲𝘀𝘁𝗼𝗻𝗲 𝗨𝗻𝗹𝗼𝗰𝗸𝗲𝗱 🔓
4⃣0⃣0⃣0⃣ ODI runs and going strong! 👍 👍
Congratulations, Smriti Mandhana 👏 👏
UPDATES ▶️ https://t.co/bcSIVpiPvQ#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/kI32uFeRX0
— BCCI Women (@BCCIWomen) January 10, 2025
हेही वाचा :