कोची : ‘तिकडे ते बिशपचा सन्मान करतात आणि इकडे उद्ध्वस्त करतात,’ अशा शब्दांत पलक्कडच्या मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चचे मेट्रोपॉलिटन युहानॉन मेलेटियस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीत कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया (CBCI) द्वारे आयोजित केलेल्या ख्रिसमस उत्सवात मोदी यांनी हजेरी लावल्याच्या पार्श्वभूमीवर या ऑर्थोडॉक्स चर्चच्या ज्येष्ठ बिशपने जोरदार टीका केली. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. (PM Modi)
पलक्कडमध्ये उभारलेला येशूच्या जन्माचा देखावा विश्व हिंदू परिषदेच्या कर्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केला. हा संदर्भ त्यांच्या या विधानाला आहे. मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चचे मेट्रोपॉलिटन युहानॉन मेलेटियस पलक्कड येथील सरकारी शाळांमध्ये ख्रिसमसच्या उत्सवात व्यत्यय आणण्याच्या दोन घटनांचा संदर्भ देत होते. एका घटनेत विहिंपच्या तीन नेत्यांना चित्तूरमध्ये अटक करण्यात आली होती, तर दुसऱ्या प्रकरणात कथित हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
पलक्कडमधील नल्लेपिल्ली येथील सरकारी प्राथमिक शाळेत ख्रिसमसच्या तयारीत शुक्रवारी विद्यार्थी आणि शिक्षक गुंतले होते. त्यावेळी विहिंपचे जिल्हा सचिव के. अनिल कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिघे कार्यकर्ते आले. त्यांनी शिक्षकांना कथितपणे प्रश्न केला की ख्रिसमसऐवजी तुम्ही कृष्ण जन्माष्टमी का साजरी करत नाही. शिक्षक सांताक्लॉजचा पोशाख का घालतात? या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PM Modi)
पलक्कड येथील आणखी एका घटनेत, थाथामंगलम येथील सरकारी प्राथमिक शाळेत उभारलेल्या देखाव्याची तोडफोड झाल्याचे सोमवारी आढळून आले. ख्रिसमस सुट्ट्या असल्याने गेल्या शुक्रवारी शाळा बंद होती. या घटनेसंदर्भातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ही पार्श्वभूमीही मेलेटियस यांच्या टीकेमागे आहे.
हेही वाचा :