प्रयागराज : महाकुंभ मेळ्यात ‘ॲपल’चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल सहभागी झाल्या आहेत. त्यांनी भगवती कालीमातेच्या बीज मंत्राची दीक्षा घेतली. निरंजनी आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी यांनी त्यांना दीक्षा दिली.(Lauren Powell)
भारतीय सनातन परंपरा खूप श्रेष्ठ आहे. त्यामुळे मला आतून खूप शांती मिळाली. भगवती कालीमातेच्या आराधनेमुळे मला आत्मिक शांती मिळाली, एक नवी दिशा गवसली आहे, अशा भावना पॉवेल यांनी व्यक्त केल्या. दीक्षा दिल्यानंतर कैलाशानंद गिरी यांनी त्यांचे नामकरण कमला असे केले. (Lauren Powell)
निरंजनी आखाड्यात अत्यंत धार्मिक आणि पवित्र अशा वातावरणात पॉवेल यांना दीक्षा देण्यात ली. यावेळी वैदिक मंत्रोच्चारण आणि कालीमातेच्या पूजाअर्चेने वातावरण भारुन गेले होते. कालीमातेची साधना केल्यामुळे माणसाच्या आयुष्यात सुख, शांती आणि सामर्थ्य मिळते, असे कैलाशानंद गिरी यावेळी म्हणाले.
दरम्यान, अमृत स्नानाच्या आधी लॉरेन पॉवेल आजारी पडल्या होत्या. स्वामी कैलाशानंद गिरी यांनी सांगितले की, त्या आमच्या शिबिरात विश्रांती घेत आहेत. याआधी त्या इतकी प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी गेल्या नाहीत. त्यांना ॲलर्जी झाली आहे. आमची परंपरा अशी आहे की, ती कधी अनुभवलेल्या लोकांनी ती पाहिली की त्यात सहभागी व्हायला उत्सुक असतात, असे ते म्हणाले. (Lauren Powell)
काशी विश्वनाथाचे दर्शन
महाकुंभ मेळ्यात येण्याआधी लॉरेन पॉवेलने काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले होते. गंगेमध्ये नौकाविहार केल्यानंतर गुलाबी सूट आणि डोक्यावर दुपट्टा घालून त्या बाबा विश्वनाथच्या दरबारात गेल्या. गर्भगृहाच्या बाहेरूनच त्यांनी दर्शन घेतले होते. सनातन धर्मात गैरहिंदू शिवलिंगाला स्पर्श करत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतले होते. (Lauren Powell)
जॉब्जची इच्छा पूर्ण करण्यासाठी…
१९७४ मध्ये ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्जनी एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्या पत्रात जॉब्ज कुंभमेळ्यासाठी येणार होते, असा दावा करण्यात येत आहे. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी लॉरेन पॉवेल भारतात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. स्टीव्ह जॉब्ज यांचे हे पत्र ४.३२ कोटीला विकले गेल्याचा दावाही माध्यमांत करण्यात येत आहे.