हैदराबाद : अभिषेक शर्माच्या झंझावाती शतकामुळे सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जविरुद्ध २४६ धावांचे
आव्हान ८ विकेट राखून यशस्वीरीत्या पार केले. या सामन्यादरम्यान, शतक झळकावल्यानंतर अभिषेकने खिशातून
चिठ्ठी काढून प्रेक्षकांना दाखवली. ‘धिस वन इज फॉर ऑरेंज आर्मी’ (ऑरेंज आर्मी, हे शतक तुम्हाला समर्पित)
असे या चिठ्ठीवर लिहिले होते. हैदराबादची नारंगी जर्सी परिधान करून मैदानावर संघाला पाठिंबा देण्यासाठी
उपस्थित असणारे प्रेक्षक ‘ऑरेंज आर्मी’ म्हणून ओळखले जातात. आपले शतक या प्रेक्षकांना समर्पित करणाऱ्या
अभिषेकने या चिठ्ठीमागील कथाही सांगितली आहे. (Abhishek Sharma)
अभिषेकने या सामन्यात ५५ चेंडूंमध्ये १४ चौकार व १० षटकारांसह १४१ धावांची खेळी केली. यंदाच्या मोसमात
त्याला यापूर्वीच्या पाच सामन्यांत मिळून केवळ ५१ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे, पंजाबविरुद्धची त्याची
खेळी अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होती. या शतकाइतकेच शतकानंतरचे त्याचे सेलिब्रेशनही अनोखे होते.
याविषयी सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना अभिषेक म्हणाला, ‘मी आजच सकाळी ही चिठ्ठी लिहिली. सकाळी
उठल्यानंतर नेहमी काहीतरी लिहायची मला सवय आहे. जर मी आजच्या सामन्यात काही करून दाखवू शकलो,
तर ते हैदराबादच्या चाहत्यांसाठी असेल, असा विचार सहज माझ्या मनात आला. सुदैवाने आजचा दिवस माझा
आहे असे मला वाटले आणि मी तशी कामगिरी केल्यानंतर ही चिठ्ठी दाखवू शकलो.’ (Abhishek Sharma)
या सामन्यापूर्वी चार दिवस आजारी असल्याचेही अभिषेकने सांगितले. “मला गेले चार दिवस ताप होता. या
दरम्यान, युवराज सिंग आणि सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूंनी सातत्याने कॉल करून माझी विचारपूस केली. असे
खेळाडू माझ्या संपर्कात असल्यामुळे माझे मनोबल वाढले. मागील काही सामन्यांत माझ्याकडून फारशा धावा
झाल्या नसल्या, माझा स्वत:वरचा विश्वास कायम होता. फक्त एका मोठ्या खेळीमुळे माझा फॉर्म परत येऊ
शकतो, हे मला माहीत होते,” असेही तो म्हणाला. (Abhishek Sharma)
अभिषेकने आतापर्यंत भारताकडून टी-२० मध्ये दोन शतके लगावली असून आयपीएलमधील त्याचे हे पहिलेच शतक
आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम त्याच्या नावावर असून त्याने
या वर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध १३५ धावा फटकावल्या होत्या. आता आयपीएलमध्येही सर्वोच्च खेळी करणारा
भारतीय खेळाडू ठरण्याचा मान त्याने पटकावला आहे. हा विक्रम यापूर्वी लोकेश राहुलच्या नावावर होता. त्याने
२०२० च्या आयपीएल मोसमात बेंगळुरूकडून खेळताना १३२ धावा केल्या होत्या.
हेही वाचा :