लंडन : जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना या भारतीय क्रिकेटपटूंचा विज्डेन नियतकालिकातर्फे सन्मान करण्यात आला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या विज्डेन क्रिकेटर्स ॲल्मनॅकच्या २०२५च्या आवृत्तीमध्ये बुमराह, मानधनाची अनुक्रमे आघाडीचे पुरुष व महिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. (Bumrah, Mandhana)
बुमराहने मागील वर्षी कसोटी कारकिर्दीतील २०० विकेटचा टप्पा पूर्ण केला. २० पेक्षा कमी सरासरी ठेवून २०० विकेट पूर्ण करणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच गोलंदाज ठरला. विज्डेनचे संपादक लॉरेन्स बूथ यांनी त्याचे वर्णन ‘स्टार ऑफ दि इयर’ असे केले आहे. मागील वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ७१ विकेट घेतल्या. त्याचबरोबर, भारताने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकण्यातही त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नोव्हेंबर, २०२४ ते जानेवारी, २०२५ दरम्यान झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत बुमराहने १३.०६ च्या सरासरीने ३२ विकेट घेतल्या. “या मालिकेतील त्याची गोलंदाजी घातक आणि अद्वितीयरीत्या आव्हानात्मक होती. त्याच्या गोलंदाजीवर काढण्यात आलेल्या धावा दुप्पट गणल्या जाव्यात, इतकी त्याची गोलंदाजी खेळणे कठीण होते. आपण सर्वकालीन महान गोलंदाज असल्याचा दावाच त्याने या मालिकेत केला,” असे बूथ यांनी म्हटले आहे. (Bumrah, Mandhana)
स्मृती मानधनाने २०२४ या वर्षामध्ये सर्व प्रकारांमध्ये मिळून १६५९ धावा केल्या. महिल् क्रिकेटमध्ये एका वर्षांत सर्वाधिक धावा जमवल्याचा हा विक्रम आहे. या वर्षभारत तिने वन-डेमध्ये चार शतकेही झळकावली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतही तिने १४९ धावांची खेळी केली होती. (Bumrah, Mandhana)
विज्डेनने टी-२० क्रिकेटमधील आघाडीचा क्रिकेटपटू वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनची निवड केली आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनरने भारताविरुद्धच्या पुणे कसोटीत घेतलेल्या १३ विकेट ही २०२४ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणून निवडली गेली. या कामगिरीमुळे न्यूझीलंडने ही कसोटी जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनचाही विज्डेनने या आवृत्तीमध्ये गौरव केला आहे. अँडरसनने १८८ कसोटींत ७०४ विकेट घेतल्यानंतर २१ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला होता.
हेही वाचा :
सिमरनप्रीत कौरला रौप्य
पुढच्यावेळी योग्य संघबांधणी महत्त्वाची