कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाईची श्री मातंगी माता रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली. देवीची अलंकार पूजा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नियमित रांगेबरोबर मुख दर्शन रांगेतही गर्दी होती. गेल्या चार दिवसात सहा लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. (Shri Matangi Mata)
देवीची श्री मातंगी माता रुपातील पूजा बांधण्यात आली. देवी श्यामवर्णी असून तीन नेत्र असलेली आहे. माथ्यावर चंद्र धारण केलेला आहे. चार हातांमध्ये भक्तांच्या शत्रूनाशासाठी अंकुश आणि तलवार, पाश आणि ढाल धारण केली आहे. (Shri Matangi Mata)
भगवान शिव हे मतंग असून, त्यांनी त्रिपुरीची उपासना केली असता, त्यांच्या नेत्रतेजातून या देवीची उत्पत्ती झाली, अशी कथा आहे. दुसऱ्या कथेत मतंगॠषींच्या कन्येच्या रुपात हिने अवतार घेतल्याने हिला ‘मातंगी’ म्हणतात. हि नववी महाविद्या असून, मतंग हे तिचे भैरव आहेत. ही श्रीकुलातील देवता उत्तराम्नायपीठस्था आहे. हिची उत्पती वैशाख शुद्ध तृतीयेस आहे. लघुश्यामा, उच्छिष्टमातंगी, राजमातंगी, सुमुखी, संमोहिनी, चंडमातंगी, वश्यमातंगी, कर्णमातंगी, तैलमातंगी इत्यादी प्रकार व उपासना भेद आहेत. देवीच्या उपासनेने वाचासिद्धि, कवित्वलाभ, वेद-वेदांत, ज्योतिष, संगीतविद्या आदि प्राप्ती होते व भक्तांच्या शत्रूचा नाश होतो, ही सर्वकामनासिद्ध करणारी देवता आहे, अशी भक्तांची भावना आहे. मातंगी देवी रुपातील आजची पूजा श्रीपूजक पुरुषोत्तम ठाणेकर, उमेश उदगावकर, संतोष जोशी व अवधूत गोरंबेकर यांनी बांधली. (Shri Matangi Mata)