पिंपरी-चिंचवड : चिंचवडमध्ये सच्चा शिवसैनिक स्वतःहून पुढे येत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. अत्यंत वाईट परिस्थितीतही निष्ठावंत आणि सच्चे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिले आहेत, असे राऊत म्हणाले. खासदार राऊत यांनी कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिक आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. १६० ते १६५ जागा जागा आम्हाला या निवडणुकीत मिळतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. (Sanjay Raut)
Shivsena UBT
मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर जुंपले आहे. आपणच बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे भासविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबईसह राज्यभरातील मतदारसंघ व विविध माध्यमातून पोस्टर व जाहिराती प्रकाशित करीत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर ठाकरेसमर्थकांनी त्यांना गद्दार म्हणून हिणवत बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली आहे. (Poster war)
शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर दोन्ही गट विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे तीन दिवस उरले असल्याने या जाहिरात ‘वॉर’मधून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर ते व्हायरल झाले आहे. शिंदे गटाने ‘मी, माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ हे बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य जाहिरातीत प्रसिद्ध केले आहे. विविध वृत्तपत्रांत त्याची जाहिरात आणि होर्डिंग लावण्यात आली आहेत. त्यातून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरेंकडून ही जाहिरात देण्यात आली आहे. त्यावर भीती, भूक, भ्रष्टाचाराचा अंध:कार आता दूर करणार मशाल, असे लिहिले आहे. त्यात सर्वात खाली बाळासाहेबांची मशाल असे नमूद केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांनी शिवसेनेची भाजपही होऊ देणार नाही, हेही सांगितले आहे. तसेच दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही, हेही सांगितले आहे. याचा सभेतून ठाकरे उल्लेख करीत आहेत. सोशल मीडियावरून दोन्ही गटांच्या समर्थकांकडून ते व्हायरल केले जात आहे.
बिद्री : प्रतिनिधी : राधानगरी मतदार संघातील स्वाभिमानी जनता विकासाला साथ देणारी आहे. भुलभलैया करुन राजकीय पोळी भाजून घेण्याचे विरोधकांचे कूटनीतीचे दिवस आता संपले आहेत. मतदारसंघातील विकासकामांनी भारावलेल्या सूज्ञ आणि स्वाभिमानी लोकगंगेच्या त्सुनामीच्या लाटेत ‘केपीं’ची उमेदवारी निश्चितच वाहून जाणार आहे, असा घणाघात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला. (Prakash Abitkar)
नाधवडे (ता.भुदरगड) येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी संपूर्ण गावातून काढलेल्या पदयात्रेत प्रचंड संख्येने युवक, महिला आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रविणसिंह सावंत, मदन देसाई, कल्याणराव निकम, अशोकराव भांदिगरे आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रविंद्र कामत यांनी केले. (Prakash Abitkar)
नाधवडे फुटलंय नव्हे जमलंय
निवडणूक प्रचारात वारं फिरलंय नाधवडे फुटलंय, अशी अफवा के. पी. पाटील गटाने पसरवली आहे. पण, येथील लोकांचा उदंड प्रतिसाद आणि उत्फूर्त गर्दी पाहून नाधवडे फुटलंय नव्हे, येथे गाव एकत्र जमलंय, असे आमदार आबिटकर म्हणताच लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
कोल्हापूर, प्रतिनिधी : काँग्रेससह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे चांगले संघटन तसेच सतेज पाटील, शाहू महाराज यांच्यासारखे कणखर नेतृत्व आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची साथ या बळावर विधानसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी महाराष्ट्र दिनमानशी बोलताना व्यक्त केला.
खासदार शाहू छत्रपतींनी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळण्याच्या भूमिकेतून मधुरिमाराजे यांची उमेदवारी मागे घेतली, मालोजीराजे यांनीही सहकार्य केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून लाटकर म्हणाले, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मला जाहीर झाली हा आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान वाटला होता, परंतु आवश्यक ती प्रक्रिया न राबवता उमेदवारी रद्द झाल्याचे दुःखही मला व माझ्या कुटुंबीयांना कार्यकर्त्यांना झाले. त्यामुळे कार्यकर्त्याचा सन्मान जपण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणार कायम राहिलो होतो. मधुरिमाराजे यांनी मोठे मन दाखवून उमेदवारी मागे घेतली, त्यांचा मी शतशः ऋणी आहे.
महापालिकेत एखाद्या प्रभागाचे नेतृत्व करणे आणि शहराचे नेतृत्व करणे यात फरक असल्याचे मान्य करून लाटकर म्हणाले, मी महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती म्हणून शहराच्या पातळीवर काम केले आहे. पत्नी महापौर होती त्या काळातही शहर नजरेसमोर ठेवूनच आम्ही सकारात्मक विचाराने काम केले. त्यामुळे कोल्हापूर शहर, इथले प्रश्न, इथल्या नागरिकांच्या समस्या यांची जाणीव आहे. आजवर काँग्रेसच्या विचारानेच चालत आलो. सतेज पाटील यांच्यासारखा हिमालयाएवढा आधारवड आमच्या पाठीमागे आहे. शाहू महाराजांसारखे नेतृत्व आहे. यांच्याबरोबरच मालोजीराजे, जयश्रीताई जाधव, दिवंगत चंद्रकांतअण्णा जाधव अशा सगळ्यांनी मिळून गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची चांगली बांधणी केली आहे. दोन्ही विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीतही आम्ही कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत होईल, याची मला खात्री आहे.
महायुती सरकारच्या काळात अनेक गोष्टी बिघडल्या. भ्रष्टाचार बोकाळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. महागाई वाढली. बेरोजगारी वाढली. या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी धार्मिक, जातीय विद्वेषाचे मुद्दे पुढे आणले जात असल्याचा आरोप करून लाटकर म्हणाले, कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. समतेची भूमी आहे. या भूमीत विषारी विचार रुजणार नाही. इथला सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. इथला सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
यावेळी झालेली प्रश्नोत्तरे अशीः
प्रश्न : तुमच्या उमेदवारीची चर्चा जेव्हा पासून सुरू होती. तुम्ही ही इच्छुक होता. त्यावेळी तुम्हाला किती टक्के शक्यता वाटत होती?
उत्तरः निवडणूक प्रक्रियेमध्ये इच्छा असणे क्रमप्राप्त आहे. पण आम्ही जे सर्वजण इच्छुक होतो. महापालिकेतील बहुतांश सहकारी आणि काही सिनियर मंडळी तयार होते. यावेळी आमच्या नेत्यांनी आपण कार्यकर्ता पॅटर्न करायचा आहे, असे सांगितले त्यामुळे वाटत होते. पण मनाला खात्री नव्हती की, पण जो काही निर्णय होईल तो आपण सगळ्यांनी एकत्र घेऊन पुढे जायचे हा निर्णय आम्ही केला होता. आणि यावर मी ठाम होतो. आजपर्यंत पक्ष, पुरोगामी विचार, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, लोकसभा अशा ठिकाणी आदेशाचे पालन करून काम केले. पक्षाकडे अर्ज भरणे, मुलाखत देणे, प्रक्रियेतून गेल्यामुळे जरा आपला नंबर लागतो का अशी आशा होती.
प्रश्नः नगरसेवक म्हणून काम केले, स्थायी समिती सभापती म्हणून काम केले, पण आपण आमदारकी लढवावी असं का वाटू लागलं?
उत्तरः कोल्हापूर उत्तर हा मतदार संघ नागरी वस्तीचा आहे. शहरातील ८१ प्रभागापैकी ५६ प्रभाग यामध्ये येतात. यामुळे या मतदार संघातील सगळे प्रश्न हे महापालिकेच्या अंतर्गत येणारे प्रश्न आहेत. यामुळे नगरसेवक म्हणून काम करत असताना नागरिकांच्या समस्या आणि अडचणी याची आम्हाला जाणीव असते. त्यामुळे समस्या सोडवण्यासाठी जे बजेट पाहिजे आणि जे ज्यादा आणि चांगल्या पद्धतीने काम करायला जो अधिकार पाहिजे त्याच्या मर्यादा या मला जाणवत होत्या. त्यातून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला. आमदार झाल्यास शहराच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावीपणे काम करता येईल, असे वाटत होते.
प्रश्नः मधुरिमाराजेंची माघार झाल्यानंतर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची भावना होती?
उत्तरः छत्रपती घराण्याने माघार घ्यावी अशी आमची इच्छा नव्हती. ठाम भूमिका नव्हती. सुरुवतीला काँग्रेसच्या चर्चेतून माझे नाव जाहीर झाले. त्यामुळे लोकभावना झाल्याने ते मनात राहिले. माघारीचे दुःख काय असते ते मला त्यावेळी जाणवले. तिकीट जाहीर झाले नसते तर त्या भावना वेगळ्या होत्या. लोकांची भावना झाली की, आपण माघार घेऊन नये. त्यामुळे माघार घेतली नाही. चर्चेतून माघार झाली असती तर बरे झाले असते. मी त्यामुळे त्या परिवाराचा शतशः आभारी आहे.
आताचा प्रलोभनाचा काळ आहे आणि माझ्या बाबतीतही तसा प्रयोग झाला. परंतु मी त्याला बधलो नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. मी बंटी साहेब व छत्रपती शाहू महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने लढायचे ठरवले होते. त्यानंतर मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर त्यांनी मला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले. मला त्यांच्याबरोबर जायचे आहे. त्यानंतर मी पाठिंब्यासाठी त्यांना पत्र दिले. त्यांचा पाठिंबा मिळाला, हा माझ्यासाठी सुध्दा सुखद धक्का होता.
शहराचे चित्र बदलायचे आहे.
कोल्हापूरच्या दरडोई उत्पन्न कमी झाले आहे. रस्ते, ट्रॅफिक जाम आहे. कचऱ्याचा प्रश्न आहे, वितरण व्यवस्था खराब आहे. हवा प्रदूषित झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे. रोजगार नाही, क्रींडागणे चांगली नाहीत. आता कोल्हापूर मध्ये विविध प्रलोभने दाखवली जात आहेत. कोल्हापुरच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत.इथे एक किलोमीटरचा चांगला रस्ता नाही. तसा दाखवा आणि लाख रुपये मिळवा अशी परिस्थिती आहे. अदृश्य हुकुमशाही केली जात आहे. छत्रपतींचे नाव घेतले जाते आणि काँन्ट्रक्टर व भांडवलदारांचे भले केले जात आहे. सार्वजनिक व्यवस्था कोलमडली आहे. महायुती सरकारने फार मोठी दुर्दशा केली आहे. घाणेरडी अवस्था केली आहे. ती बदलायची आहे.
मुंबई : प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणाचा जो चिखल झाला, त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री व्हायचे, म्हणून त्यांनी जनतेचे मतदान नाकारून काँग्रेसशी बस्तान बांधले. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली, असे ते म्हणाले.
आपली विचारप्रणाली सोडून दुसऱ्याच्या विचारप्रणालीत बसायचे, त्यानेही ती गोष्ट स्वीकाराची, अशी गोष्ट कधी पाहिली नाही. माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली, तर मी त्याच दिवशी दुकान बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले; पण यांनी त्यांच्याच बाजूला दुकान मांडले. त्यांनी बाळासाहेबांच्या नावाच्या आधीचे हिंदुहृदयसम्राट काढून टाकले, अशा शब्दांत उद्धव यांच्यावर हल्ला चढवत ते म्हणाले, की उद्धव यांच्या व्यक्तिगत महत्वकक्षेतून हे झाले. मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे यासाठी भाजपशी सौदा गेला.
मोदी, अमित शाह वेगवेगळ्या सभेत आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सांगत होते, त्यावेळी का आक्षेप घेतला नाही? सुरुवातीला शरद पवार यांच्यांशी बोलायला सुरुवात केली. अजित पवार यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात टाकणार होते, त्यांच्यासोबत तुम्ही शपथविधी करता. इतक्या स्वार्थाने तुम्ही विचारप्रणालीला मागे सारले. लोकांनी मत दिले त्याला लाथाडले. याची जर महाराष्ट्राला चटक लागली तर राजकारण कुठे जाईल? उद्या या गोष्टी वाढल्या तर कोण राहील इथे, अशी टीका करून राज म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी गोष्ट केली, ती अत्यंत योग्य केली. कारण तुम्ही विचारप्रणाली, बाळासाहेब सर्वांना बाजूला काढले. काँग्रेससोबत जाऊन बसणे हे कोणालाच पटले नसेल. इतकी वर्षे ज्यांना विरोध केला, त्यांच्यासोबत सत्तेत बसणे हे कोणालाच आवडले नाही. ही गोष्ट आधीच झाली असती; पण मध्ये कोविड आला, असे ते म्हणाले.
मुंबई, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहीरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय करणावर व पाच वर्षांत काय करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. महिलांना वर्षाला पाचशे रुपयांतद ६ सिलेंडर देण्याबरोबरच महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणण्याची ग्वाही देण्यात आली आहे. ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज, नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर, सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरल्या जातील, एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल, सरकारी नोकऱ्यांतील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुशेष भरून काढणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेणार आदी आश्वासने महाराष्ट्रनामा मध्ये देण्यात आली आहेत.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवू, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे सरकार स्थापन करुन २०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प या जाहीरनाम्यातून केला आहे.
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक मुंबईकडे आर्थिकदृष्या, रोजगारासाठी, उत्पादन, गुंतवणुकीच्या दृष्टीने अपेक्षेने पहातात. देशभरातून लोक मुंबईत स्वप्न घेऊन येतात व मुंबई त्यांना सामावून घेते, त्यांच्या स्वप्नांचा बळ देते. सामाजिक बदलातही महाराष्ट्र आघाडीवर असतो. महाराष्ट्राची निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे. भाजप युतीचे खोके सरकार सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचे आणण्याचे आवाहनही खर्गे यांनी केले.
खर्गे पुढे म्हणाले, कर्नाटकात काँग्रेस सरकार महिलांना महालक्ष्मी योजनेतून दोन हजार रुपये देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची खिल्ली उडवली आणि आता त्यांचेच सरकार महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतून १५०० रुपये देत आहे. काँग्रेसच्या योजनेची नक्कल भाजपने केली आहे. राहुल गांधी यांनी संविधानाचे लाल रंगाचे पुस्तक दाखवले तर त्याला शहरी नक्षलवाद म्हणून टीका करत आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे संविधान दिल्याचा फोटो दाखवून खर्गे यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या टीकेतील हवा काढून घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजप युती सरकारला दीड वर्षात शेतकऱ्यांची आठवण आली नाही पण आता कर्जमाफी करण्याच्या वल्गणा करु लागले आहेत. पराभव दिसत असल्याने त्यांना महागाई, बेरोजगारी, महिला, शेतकरी यांची आठवण झाली आहे. भाजप युती सरकार खाली खेचण्याची वेळ आली असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने परिवर्तन करण्याचा मानस बनवला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र कधी कोणाचा गुलाम बनला नाही व बनणार नाही हा जाहीरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ म्हणणारे नरेंद्र मोदी जोपर्यत महाराष्ट्रात येत राहतील तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ, राहील. जाहिरनामा समितीच्या सदस्य खा. वंदना चव्हाण यांनी मविआच्या जाहिरनाम्याबद्दलची सविस्तर माहिती दिली. तर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, खासदार अभिषेक मनु सिंघवी, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
धाराशिव : प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी आहे, त्यांनी अडीच वर्षात फक्त विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी परंडा येथे शिंदे यांची सभा झाली. या वेळी ते बोलत होते. शिंदे यांनी सावंत यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी देण्याचे संकेत दिले आहेत. ‘तानाजीरावांना तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी’, असा शब्द शिंदे यांनी दिल्याने महायुतीचे सरकार आल्यावर सावंत यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिंदे म्हणाले, की बाळासाहेबांचे विचार विकायला निघाले, तेव्हा आम्ही उठाव करण्याचे धाडस केले. त्या वेळी तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्याचे भाग्य मला मिळाले.
पूर्ण बहुमताचे सरकार आणल्यावर आम्ही अधिकृतपणे उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे काम केले आहे. शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. धनुष्यबाण आमचा आहे, असे म्हणणाऱ्यांनी आपली मशालसुद्धा आता दुसऱ्याच्या हातात देऊन टाकली आहे. ठाकरेंची मशाल ही क्रांतीची मशाल नाही, ती घराघरात आग लावणारी मशाल आहे’, अशी टीका शिंदे यांनी या वेळी केली. आम्ही आमच्या कार्यकाळात राज्याचा विकास केला. परंडा येथील प्रचारसभा ही विजयाची सभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बुलडाणा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. छत्रपती शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे, तो मावळ्यांच्या हातात शोभतो. दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही. आपल्या पक्षावर दरोडा घातला. चाळीस जणांची टोळी आली. दरोडा घालून पक्ष चोरून नेला. आता म्हणत आहेत, की हा पक्ष आमचा आहे. गद्दारच आहेत ते. खोकेबाज आणि धोकेबाज आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपची पिसे काढली. जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी बुलडाण्यात ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या नाही. मागच्या वेळी गद्दारांवर विश्वास ठेवला आणि चूक केली, त्याबद्दल माफी मागतो. छत्रपती शिवरायांचा झेंडा घेऊन नाचवत आहेत, ते काही सगळेच मावळे नाहीत. गेल्या वेळी आपण चूक केली. मी निवडणुकीच्या प्रचारात फिरतो आहे, तर पाहिले की प्रत्येक ठिकाणी आपल्या विरोधात आपला गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच आहे ही चूक माझी आहे, कारण यांना तिकिट विश्वास ठेवून मी दिले होते. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गद्दारांना निवडून दिले होते. आता त्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. पन्नास खोके आता नॉट ओके. आता यांनी एवढे कमावले आहे, की त्यांना हरवले, तरी काही फरक पडत नाही एवढे त्यांनी कमावले आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.
५० खोके तर आता सुटे पैसे झाले आहेत, असे ते म्हणाले. भाजपवाल्यांची आणि मोदी यांची आम्हाला कमाल वाटते. चोर दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येत आहात ? भाजपला कुणी ओळखत नव्हते, तेव्हा आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एक नारा देऊन गेले, की बटेंगे तो कटेंगे. कुणाची हिंमत आहे असे करण्याची? आम्हाला काय शिकवत आहात ? असा सवाल ठाकरे यांनी केला. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बारा बलुतेदार सगळे आमच्या पाठीशी आहेत. योगीजी, तुमच्या महायुतीकडे बघा. तुमचे गुलाबी जॅकेटवाले म्हणाले, बाहेरच्या लोकांनी येऊन लुडबूड करू नये. महायुतीत एकवाक्यता नसेल तर तुम्ही आम्हाला कशाला शिकवता ? असाही प्रश्न त्यांनी विचारला.
तंगडे धरून फेकून देऊ
हिंदुत्वाचा भ्रम तुम्ही निर्माण केलात. वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात ? ठीक आहे तुमचे तंगडे धरून तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिले नाही, तर मी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलणार नाही,’ असा इशारा ठाकरे यांनी दिला.
मुंबई; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी आज (दि.२३) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला. ते गेले काही मुंबईत तळ ठोकून होते. राधानगरी भुदरगड मतदारसंघाची जागा ठाकरे शिवसेने गटाकडे गेल्याने माजी आमदार के.पी.पाटील व त्यांचे मेहुणे ए.वाय.पाटील यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.
आज (दि.२३) मातोश्री येथे माजी आमदार के.पी.पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत, संजय राऊत आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
मुंबई/संगमनेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांत उडालेले खटके, त्यातून आलेली टोकाची विधाने आणि निर्माण झालेले एकमेकांविषयीचे अविश्वासाचे वातावरण लक्षात घेता काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची जबाबदारी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी तातडीने शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यांशी समन्वय साधला. त्यानंतर जागावाटपाचे गाडे रुळावर आले असून, काही जागा कमी जास्त झाल्या, तरी दोन पक्षांतील रुंदावलेली दरी कमी करण्यात त्यांना यश आले आहे. (MVA)
राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्लीत पाचरण करण्यात आले होते. त्या सर्वांसमोर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थोरात यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवली. या नव्या जबाबदारीने थोरात यांचे पक्षाअंतर्गत वजन वाढण्याचे सांगितले जाते. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात काहीसा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी चर्चेचा सूत्रे हाती घेत महाविकास आघाडीचे गाडे पुन्हा रुळावर आणले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे आघाडीत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता काँग्रेसने अनुभवी नेतृत्व असलेल्या थोरात यांच्याकडे चर्चची सूत्रे सोपवली होती. आ. थोरात यांनी आज (दि.२२) सकाळी मुंबईत येत पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते मातोश्रीवर ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले.
आ. थोरात यांनी मातोश्रीवर महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. या फॉर्म्युलानुसार, काँग्रेस पक्ष ११० जागांवर लढणार होता. यापैकी ५ जागा चर्चेअंती कमी जास्त होण्याची शक्यता आहे, तर ठाकरे यांची शिवसेना ९० जागांवर लढणार होती. यामध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पाच जागा कमी होऊ शकतात, तर शरद पवार गट ७५ जागांवर लढणार होता; मात्र आता तडजोड करण्यासाठी हा जागांचा आकडा वरखाली होण्याची शक्यता आहे. (MVA)
हे जागावाटप करताना महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचाही विचार करण्यात आला आहे. या जागांचे वाटप झाल्यानंतर समाजवादी पक्षाला सामावून घेण्यासंदर्भात निर्णय होईल, असे सांगितले जाते. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना जागा वाटपाच्या कारणावरून राऊत यांनी पटोले यांना लक्ष केले. पटोले यांनीही त्यांना उत्तर दिल्याने मोठे शाब्दिक युद्ध रंगले. त्याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटले.
नंतर या उभयतांनी माध्यमांसमोर येत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हे पान उलटत नाही तोच खा. राऊत दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांना भेटले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही गुप्त भेट झाल्याची बातमी पसरली. एवढेच नाही, तर स्वबळावर लढण्याची भाषाही बोलली गेली. या प्रमुख घटनांसह अन्य छोटे मोठे खटके या दोन महत्त्वाच्या पक्षात उडाल्याने महाविकास आघाडी संकटात येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. राज्यातील या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या काँग्रेसच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांना काल दिल्लीत पाचारण केले. सर्वांशी चर्चा केल्यानंतर समन्वयाची जबाबदारी थोरात यांच्यावर सोपवण्याचा निर्णय पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतला. थोरात यांनीही उत्साहाने नवी जबाबदारी स्वीकारत आज पवार यांची भेट घेतली. नंतर त्यांनी ठाकरे यांच्यांशीही चर्चा केली.
थोरात हे शांत, संयमी व तोलून मापून बोलणारे अनुभवी नेते समजले जातात. माध्यमस्नेही नसल्याने ते काहीसे मागे पडतात, अशी कबुली काँग्रेसमधील त्यांचे समर्थक देत असतात. २०१९ मधील विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी आकाराला आणण्याचे महत्त्वाचे काम खासदार राऊत, आमदार थोरात यांनी शरद पवार यांच्या साथीने केले होते. त्या वेळी शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास सुरुवातीला प्रतिकूल असलेल्या दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींची मने वळविण्यात थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हीच बाब ओळखून आता पक्षश्रेष्ठींनी त्यांना समन्वयाची जबाबदारी दिली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत परत विश्वासाचे वातावरण निर्माण करत पक्षासाठी यशस्वी वाटाघाटी करण्यात आता थोरात यांची खरी कसोटी लागणार आहे. (MVA)
पटोले हे मूलतः आक्रमक स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपमधून त्यांचा झालेला काँग्रेस प्रवेश, विधानसभेचे तत्कालीन अध्यक्षपद आश्चर्यकारकरीत्या सोडणे आणि अन्य काही गोष्टींमुळे काँग्रेस पक्षात त्यांच्याविषयी अविश्वासाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर राऊत आणि त्यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचे तात्कालिक कारण पटोले यांना महागात पडले आहे.
महायुतीचे घोडे अडले २५ जागांवर
महायुतीचे जागावाटप २५ जागांमुळे रखडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. भाजपने पहिली जागा जाहीर केल्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ६० नावांची यादी बैठकीत मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. या वेळी विद्यमान आमदारांना तिकिट देण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. उर्वरित २५ जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आल्याचे कळते. त्यावर स्थानिक पक्षीय बलाबल, जातीय राजकारण या जागांवर तीन पक्षातील प्रमुख नेते बसून निर्णय घेतला जाणार असल्याची आहे.
हेही वाचा :