कोल्हापूर: प्रतिनिधी : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात पुरातत्व विभागाच्यावतीने संवर्धनाचे काम सुरू असल्याने १४ मार्च ते १७ मार्च या कालावधीत अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. त्याऐवजी भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सांगितले आहे. भाविकांना देवीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.
पुरातत्व विभागाच्यावतीने अंबाबाई मंदिर आणि परिसरात जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यासाठी १४३ कोटींचा निधी उपलब्ध झाला. त्यानुसार सध्या मंदिरात काम सुरू आहे. मंदिरातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी श्री अंबाबाई व श्री महासरस्वती या तिन्ही गर्भगृहांचे अंतर्गत व बाह्य भागांचे जतन व संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. या कामाच्या अनुषंगाने वरील कालावधीत संबंधित गर्भगृहांमध्ये नेहमीप्रमाणे दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही. देवीचा मुख्य गाभारा बंद राहणार आहे. तीन दिवस भाविकांसाठी श्रीच्या प्राणप्रतिष्ठापीत मंगल श्रीकलश तसेच श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन पितळी उंबरा येथून करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तीन दिवस भक्तांना पितळी उंबरठा व श्री गणपती मंडप येथून देवीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येईल.
१७ मार्च रोजी विधी झाल्यानंतर दुपारी १२.३० वाजताच्या आरतीपासून अंबाबाईचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात येईल. भक्तांनी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी केले आहे.