कोल्हापूर : प्रतिनिधी : केएसए वरिष्ठ अ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर १-० असा निसटता विजय मिळवला. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने बीजीएम स्पोर्टस् संघाचा ३-१ अशा गोलफरकाने पराभव केला. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन आयोजित हा सामना शाहू स्टेडियमवर खेळवण्यात आला. (KSA Football)
शिवाजी आणि दिलबहार यांच्यातील सामना चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी आघाडी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण अचूक समन्यवयाअभावी दोन्ही संघ गोल करु शकले नाहीत. मध्यंत्तरास सामना शून्य गोलबरोबरीत होता. उत्तरार्धात ४५ व्या मिनिटाला संकेत नितिन साळोखेने गोल करत शिवाजी संघाला आघाडीवर नेले. परतफेड करण्यासाठी दिलबहारने जोरदार चढाया केल्या. पण शिवाजी संघाने भक्कम बचाव ठेवत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. आजच्या विजयाने शिवाजी संघाला तीन गुण मिळाले. दोन सामन्यात शिवाजी संघाचे गुण सहा झाले आहेत. (KSA Football)
तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात फुलेवाडी संघाने बीजीएम स्पोर्टस् संघांवर ३-१ असा विजय संपादन केला. पूर्वार्धात अलेश सावंतने सातव्या मिनिटाला गोल करत फुलेवाडी संघाचे खाते खोलले. मध्यंत्तरास फुलेवाडी संघ १-० असा आघाडीवर होता. उत्तरार्धात फुलेवाडी संघाच्या आघाडी फळीने उत्कृष्ट खेळ केला. ४६ आणि ५९ व्या मिनिटाला सिद्धांत शिरोडकरने सलग दोन गोल करत फुलेवाडी संघास ३-० अशी घसघशीत आघाडी मिळवून दिली. ‘बीजीएम’च्या ओंकार पाटीलने ६५ व्या मिनिटाला गोल केला. दोन गोलची आघाडी कायम टिकवत फुलेवाडी संघाने विजय मिळवत तीन गुणांची कमाई केली. फुलेवाडी संघाचा स्पर्धेतील पहिला विजय आहे. (KSA Football)
- मंगळवारचे सामने
- प्रॅक्टिस फुटबॉल क्लब वि. वर्षा विश्वास तरुण मंडळ : दुपारी २.०० वा.
- पाटाकडील तालीम मंडळ अ वि. संध्यामठ तरुण मंडळ : दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :
बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुकणार?
हरमनप्रीत, रेणुकाला विश्रांती