कोलकाता, वृत्तसंस्था : मागील वर्षभरापासून दुखापतीमुळे स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असणारा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात शमी बंगाल संघाकडून खेळेल. (Mohammed Shami)
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामना खेळल्यानंतर ३४ वर्षीय शमीला पायाचा घोटा दुखावल्यामुळे क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेमध्ये शमी खेळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. तथापि, पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याचा समावेश संघात न करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला.
याच कारणास्तव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठीही त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. तथापि, आता शमीने रणजी स्पर्धेत फिटनेस सिद्ध केल्यास बॉर्डर-गावसकर मालिकेतील पुढील सामन्यांसाठी त्याची निवड होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Mohammed Shami)
दरम्यान, शमीच्या समावेशामुळे बंगाल संघाची ताकद वाढली असल्याची माहिती बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) सचिव नरेश ओझा यांनी दिली. बंगाल-मध्य प्रदेश सामना बुधवारपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे.