-प्रा. प्रशांत नागावकर
रजनीगंधा कला अकॅडमी यांनी महान नॉर्वेजियन नाटककार हेन्रिक इब्सेन यांचे गाजलेले नाटक ‘ॲन एनिमी ऑफ द पीपल,’ हे चर्चानाट्य अत्यंतो सफाईदारपणे सादर केले.
शेक्सपियरच्या बरोबरीने नॉर्वेजियन नाटककार इब्सेन याचे नाव घेतले जाते. मराठी नाटकाशी आणि साहित्याशी इब्सेनचे अतूट नाते आहे. आधुनिक रंगभूमीच्या शिल्पकाराचे सारे श्रेय इब्सेनला दिले जाते. त्याच्या नाटकाने मरगळ आलेल्या पाश्चिमात्य रंगभूमीला टवटवी आणली. म्हणूनच त्याला आधुनिक नाटकाचा जनक असेही म्हटले जाते. इब्सेन आणि त्याच्या नाटकांनी सामाजिक गरजांपेक्षा माणसाला काय वाटते याला अधिक महत्त्व दिले. माणसाची सद्सदविवेक बुद्धी आणि त्याची इच्छा-आकांक्षा इब्सेननी आपल्या नाटकातून अधोरेखित केली आहे. समाज काय म्हणतो यापेक्षा माणसाने आपल्याला पटेल तसे वागले पाहिजे या ‘नवनैतिक मूल्यां’चा त्याने आपल्या नाटकातून विशेष पुरस्कार केला. ‘पिलर्स ऑफ सोसायटी’ (१८७७), ‘ए डॉल्स हाऊस’ (१८७९), ‘घोस्ट’ (१८८१), ‘ॲन एनिमी ऑफ द पीपल’ (१८८२) ही त्याची इतर काही गाजलेली नाटके.
‘ॲन एनिमी ऑफ द पीपल’ या नाटकातून इब्सेनने समाजातील बदलत चाललेल्या नीतीमूल्यांवर मार्मिक भाष्य केले आहे. या नाटकांमधून व्यक्तिगत अखंडता आणि सामाजिक समस्यांमधील संघर्ष अधोरेखित केला आहे. हे नाटक डॉ. थॉमस स्टॉकमन यांच्यावर केंद्रित आहे. ज्यांना त्यांच्या शहरातील नवीन स्नानगृहातील पाण्यामध्ये दूषिततेची गंभीर समस्या आढळून येते. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो, हे सत्य उघड करण्याच्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे स्थानिक नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या जातात. महापौर पीटर स्टॉकमन हा त्यांचा भाऊ आहे, त्याचीही तशीच प्रतिक्रिया असते.
आर्थिक आणि पर्यावरणीय चिंतेने ग्रासलेल्या समुदायाच्या पार्श्वभूमीवर हे नाटक प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आणि त्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या कठोर परिणामांवर प्रकाश टाकते. या नाटकातील संघर्षाचे चित्र सत्य आणि सोयी यांच्यातील ताण-तणावावर भर देते. व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या नायकाच्या नैतिक भूमिकेबद्दलचे त्याचे जटिल आणि गुंतागुंतीचे दृष्टिकोन या नाटकातून प्रतिबिंबित होतात. नैतिक आणि सामाजिक संघर्षाचा हा शोध इब्सेनच्या अनेक नाटकातून आपल्याला दिसून येतो.
‘ॲन एनिमी ऑफ द पीपल’ या नाटकातून सामाजिक समस्यांची अत्यंत स्फोटक अशी हाताळणी केली आहे.
या नाटकाचा अनुवाद आणि दिग्दर्शन कोल्हापुरातील जेष्ठ रंगकर्मी ज्ञानेश मुळे यांनी केले आहे. ज्ञानेश मुळे सातत्याने कोल्हापूर रंगभूमीवर कार्यरत आहेत. ते राज्यनाट्य स्पर्धेत आपला सातत्याने सहभाग नोंदवतात. त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः नाटक लिहितात आणि दिग्दर्शित करतात. ‘ती अशी…,’ ‘चुकलेल्या वाटेचे मनोगत,’ ‘वादळवेणा,’‘केळ ते काश्मीर,’ ‘मुक्काम खुलताबाद’ इत्यादी नाटके त्यांनी स्वतः लिहिली आहेत आणि दिग्दर्शित केली आहेत. शिवाजी विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘युज अँड थ्रो,’ ‘तुघलक,’ ‘अंधायुग’ यांसारख्या कलाकृतीही सादर केल्या आहेत. यापूर्वी हेच नाटक त्यांनी ‘रसिक कला मंच’च्या वतीने २००८ च्या राज्यनाट्य स्पर्धेत सादर केले होते.
ॲन एनिमी ऑफ द पीपल या नाटकाचा प्रयोग अत्यंत सफाईदारपणे त्यातील कलाकारांनी सादर केला. आणि याचे सारे श्रेय अनुवादक आणि दिग्दर्शक म्हणून ज्ञानेश मुळे यांना द्यावे लागते. चर्चानाट्य दिग्दर्शित करणे आणि सादर करणे ही अवघड गोष्ट असते. ज्या नाटकांमध्ये सातत्याने काहीतरी घडत असते, व्यक्तिरेखांच्या हालचालींना वाव आहे, अशी नाटके प्रेक्षकांना खेळून ठेवतात. सहाजिकच अशा नाटकाचे दिग्दर्शन करणे वा पात्रांच्या हालचाली बसवणे हे सहज सोपे असते. आणि प्रेक्षकही या नाटकांकडे आकर्षित होत असतात. पण चर्चानाट्यामध्ये गोष्टी अवघड होतात. चर्चानाट्यामध्ये केवळ वाचिक अभिनय हाच एक महत्त्वाचा निकष मानला जातो. अनावश्यक हालचाली चर्चानाट्यात टाळल्या जातात. साहजिकच अशी नाटके दिग्दर्शित करणे आणि प्रेक्षकांना त्यात गुंतवून ठेवणे हे अवघड असते. पण ज्ञानेश मुळे यांनी त्यांच्या एकूणच अनुभवाच्या जोरावर ही जबाबदारी खूप सहजतेने पेलली आहे. पहिला अंक प्रेक्षकांच्या दृष्टीने नाटक समजून घेण्यात गेला असला, थोडासा रेंगाळला असला तरी दुसऱ्या अंकात मात्र या नाटकाने पकड घेतल्याचे जाणवते.
सर्वच कलाकारांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका अत्यंत समजून घेऊन तितक्याच ताकदीने सादर केल्या आहेत. अनावश्यक हालचाली किंवा हातवारे टाळून केवळ संवादफेकीवर भर देत संवादातील आशय पर्यायाने नाटकाचा आशय पोहोचवण्यात सर्वच कलाकार यशस्वी झालेले आहेत. यात दिग्दर्शकाचे मोठे योगदान आहे, हे वेगळे सांगण्याची गोष्ट नाही. या नाटकात कमी अधिक लांबीच्या अशा भूमिका जरी असल्या तरी सर्वच कलाकारानी आपल्या भूमिकांना समान व योग्य न्याय दिलेला आहे. कोणत्याच कलाकाराच्या अभिनयामध्ये डाव- उजवं असं करता येणं अशक्य आहे.
विकास कांबळे यांनी या नाटकात डॉ. स्टॉकमन ही मध्यवर्ती भूमिका साकार केली आहे. एकूण भूमिकेची लांबी ही इतर कलाकारांपेक्षा थोडीशी अधिक असल्याने त्यांचा स्वतंत्र उल्लेख करणे गरजेचे आहे. कांबळेंनी मध्यवर्ती भूमिकेचे दडपण न घेता अत्यंत सहजतेने स्टॉकमन उभा केला. सर्वसामान्य माणसाचे व्यवस्थेच्या विरोधात उभा राहणे, प्रचंड विरोध होऊनही न घाबरता प्रामाणिक राहणे, हतबलता, नैराश्य पचवून नव्याने संघर्षाला सिद्ध होणे या विविध गोष्टी त्यातील बारकावे त्यांनी आपल्या अभिनयातून समर्थपणे व्यक्त केले आहेत. स्टॉकमन सादर करत असताना वाचिक अभिनयावर त्यांनी विशेष भर दिल्याचे दिसून येते.
या नाटकातील सर्वच कलाकारांनी सहजतेने अभिनय केला आहे. आपल्या व्यक्तिरेखांना अभिनयातून न्याय दिला. संवादातील आशय नेमकेपणाने पोहोचवण्यात सर्वच कलाकार यशस्वी झाले आहेत.
पीटर-सुशांत करोशी, कॅथरिन -रोहिणी औतडे, पेट्रा- प्रेरणा कवठेकर, हॉवस्टड – शिरीष विचारे, अस्लाकसन-खंडू कोल्हे, बिलिंग-सुमित वर्णे आणि नागरिकांमध्ये ओंकार पाटील, प्रशांत माने, रोहिदास अभंगे, सौरभ सुतार, बाहुबली पाटील या सर्वांनी आपल्या भूमिका उत्तमपणे सादर केल्या. जुन्या काळातील पश्चिमात्य शैली सर्वच कलाकारांनी योग्य पद्धतीने सांभाळली आहे. उदाहरणार्थ, अभिवादन करणे, हातवारे, खाणे, ड्रिंक्स घेणे, इत्यादी.
प्रकाश योजनेमध्ये सफाईदारपणा होता. लाल रंग व्यवस्थेविरोधात बंडखोरीचे सूचन करत होता.
ओंकार पाटील यांनी नेपथ्य, रंगभूषा आणि वेशभूषा या तिन्ही जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने सांभाळल्या. या तिन्ही बाबी नाटकाच्या आशयाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या होत्या. नेपथ्यामधून साधारणपणे १९८२ चा नॉर्वेमधील काळ सूचकात्मक पद्धतीने उभा केला आहे. त्याचबरोबर पाश्चिमात्य वळणाची रंगभूषा आणि वेशभूषा अचूकपणाने केली आहे.
इब्सेनसारख्या दिग्गज नाटककरांच्या नाटकाचा अनुवाद करणे ही सहज सोपी गोष्ट नसते. नाटकातील आशय नेमकेपणाने आपल्या भाषेत आणणे हे एका चांगल्या अनुवादकाचे लक्षण असते. या कसोटीला ज्ञानेश मुळे पूर्णपणे उतरलेले दिसतात. त्यांची भाषेवरील पकड लक्षात येते. त्याचबरोबर चर्चानाट्याला आवश्यक असणाऱ्या सर्व दिग्दर्शकीय बाबी त्यांनी तंतोतंत पाळल्या आहेत. एक नेटका आणि सफाईदार प्रयोग म्हणून या नाटकाचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही.
नाटक : ॲन एनिमी ऑफ द पीपल
मूळ लेखक : हेन्रिक इब्सेन
अनुवाद आणि दिग्दर्शन : ज्ञानेश मुळे
सादरकर्ते : रसिक कला मंच, कोल्हापूर
नेपथ्य, रंगभूषा आणि वेशभूषा : ओंकार पाटील
प्रकाश योजना : धीरज पलसे
पार्श्वसंगीत : आश्विनी कांबळे
भूमिका आणि कलावंत
डॉ. स्टॉकमन : विकास कांबळे
पीटर : सुशांत करोशी
कॅथरिन : रोहिणी औतडे
पेट्रा : प्रेरणा कवठेकर
हॉवस्टड : शिरीष विचारे
अस्लाकसन : खंडू कोल्हे
बिलिंग : सुमित वर्णे
(छाया : अर्जुन टाकळकर)