जमीर काझी : मुंबई : कुणी झाडे तोडायला आले तर तो कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे असं समजा, हातात थाळ्या-वाट्या घेऊन वाजवत त्यांना हाकलवून लावा, असे आवाहन जेष्ठ अभिनेते व पर्यावरणवादी कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी सोमवारी केले .रायगड जिल्ह्यातील कर्जत-भिमाशंकर परिसरातील ऊर्जा प्रकल्पासाठी २३ हजार वृक्षांची तोड केली जाणार आहे. त्याला स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमी आणि विरोधी पक्षाचा तीव्र विरोध होत आहे. सयाजी शिंदे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार परिषदेत वृक्ष प्रेमी संघटना समवेत पत्रकार परिषद घेऊन कर्जत मधील वृक्षतोड्याच्या सरकारच्या निर्णयाला ठाम विरोध करण्याचे जाहीर केले. (Sayaji Shinde takes an aggressive stance against tree felling)
झाडे तोडणाऱ्यांना हाकलून लावा
यापुढे एकही झाड तोडू दिलं जाणार नाही, असा निश्चय करून ते म्हणाले की, गुजरातच्या टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी एकीकडे वृक्षतोड सुरू आहे, या प्रकल्पासाठी एकही झाड तोडू दिलं जाणार नाही. कुणी झाडे तोडायला आले तर तो कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे असं समजा आणि हातात ताटं-वाट्या घेऊन वाजवत त्यांना हाकलवून लावा.
पशु-पक्ष्यांच्या घरावर बॉम्ब टाकतोय
सह्याद्री हे जगातले एक मोठं आश्चर्य आहे. अशा पद्धतीने पशु-पक्षांच्या घरावर बॉम्ब टाकून, त्यांना उद्ध्वस्त करून आपण काय साध्य करतोय ?, असा सवाल करून ते म्हणाले “विकासकामांच्या नावावर जमिनी घेतल्या तर तिथल्या पुढच्या पिढ्या भिकेला लागतील. यापुढे एकही झाड तोडू देऊ नका नाहीतर विकास संपलेला आहे असं समजा. यामध्ये एकही झाड न तोडता हा प्रकल्प करावा, आमचा त्याला विरोध नाही. जगात फक्त १८ टक्के जंगले शिल्लक आहेत. ते आपल्याला ३३ टक्के करणे आवश्यक आहे. पण ते वाढवण्याऐवजी ही झाडं तोडली जात आहेत.
भीमाशंकरमध्ये शेकरु हा राज्यप्राणी
शेकरू हा राज्यप्राणी हा भिमाशंकर अभयारण्यामध्ये आहे. पण आपण फक्त भिमाशंकर अभयारण्यामध्येच राहायचं, बाजूच्या कर्जतमध्ये जायचं नाही ही सीमा त्याला कशी समजणार? पशुपक्षांच्या घरावर बॉम्ब टाकून, त्यांना उद्ध्वस्त करून आपण काय साध्य करतोय? शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची झाडं तोडून आपण काय करतोय? असा सवाल सयाजी शिंदे यांनी केला. (Sayaji Shinde takes an aggressive stance against tree felling)
सेव्ह सह्याद्री संघटना स्थापन करणार
टोरेंटसारखा एकही प्रकल्प आम्हाला नको. त्यासाठी कोणतीही झाडे तोडायला नकोत. जी जुनी पर्यावरणाची व्यवस्था आहे त्याला हात न लावता हे प्रकल्प करा. पर्यावरण नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे का? आहे ती मोठी झाडं तोडू नका, हीच आमची मागणी आहे, ‘सेव्ह सह्याद्री’ अशी एक संघटना तयार करतोय. त्यामध्ये एक लाख मुले तयार करतोय. त्या माध्यमातून सह्याद्रीमध्ये अशा प्रकारच्या पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पांना आम्ही विरोध करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील प्रकल्पासाठी १० लाख झाडे तोडली जाणार
यावेळी अनेकपर्यावरणवाद्यांनी त्यांची मते मांडली. नाशिकमध्ये हजारो झाडे तोडली जात आहेत. शक्तिपीठसाठीही झाडं तोडली जात आहेत. पालघरच्या एमआयडीसी प्रकल्पासाठी पाच लाख झाडे तोडली जाणार आहेत. शिरोडला ७० हजार झाडे तोडली जाणार आहेत. राज्यात अनेक प्रकल्प असे आहेत त्यासाठी १० लाख झाडे तोडली जाणार आहेत. ही शासकीय आकडेवारी आहे, त्यामुळे यापेक्षा तिप्पट झाडे तोडली जातील असा आमचा संशय आहे, असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं.
यातून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आपली संवेदनशीलता संपत चालली आहे. चुकीच्या गोष्टींसाठी विरोध केल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाहीत. यासाठी जी काही कायदेशीर प्रक्रिया गरजेची आहे ती आम्ही करू, असंही मत व्यक्त करण्यात आले.
आदित्य ठाकरे, राऊत यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ.आदित्य ठाकरे खा.संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे आदींनी आज कर्जतला जाऊन जंगलातील वृक्षतोड सुरू असलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत यापुढे एकही झाडाची कत्तल होऊ न देण्याचा निर्धार केला सरकारने पहिल्यांदा झाडे लावून दाखवावी ,त्यानंतरच वृक्षतोडीबाबत विचार करावा, आम्ही त्यांना त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. (Sayaji Shinde takes an aggressive stance against tree felling)