मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री होण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोंदूबाबा खरात याच्याकडून अघोरी पूजा करुन घेतली होती, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी अघोरी पूजा सुरू झाली तेव्हा त्यांनी अशोक खरातविरोधात कारवाई सुरू केली असा दावाही सपकाळ यांनी केली.
भोंदुगिरी करुन महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असून त्यांचे लागेबांधे राजकीय नेते, अधिकाऱ्याबरोबर होते असे दिसून आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्याशी संबध असल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. (Chandrakant Patil underwent an Aghori ritual performed by Kharat)
भोंदूबाबा खरात यांचे अनेक कारनामे बाहेर येत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकारने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील. अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे. (Chandrakant Patil underwent an Aghori ritual performed by Kharat)
भोदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती. पण त्यांच्या मित्रपक्षातील सहका-यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदू बाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरु केली..भोंदू बाबाच्या निमित्ताने ते आता मित्र पक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. (Chandrakant Patil underwent an Aghori ritual performed by Kharat)