मुंबई : प्रतिनिधी : मेळघाट परिसरातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत वेळेत मिळावी यासाठी १०२ रुग्णवाहिका सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यावर शासन भर देत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आमदार संजय खोडके यांनी प्रश्न उपस्थित केला. (102 ambulance services will be made more effective in Melghat)
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, मेळघाटसारख्या दुर्गम भागात गर्भवती महिला, माता व बालकांना वेळेत आरोग्य सेवा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत १०२ रुग्णवाहिका सेवा कार्यरत असून या सेवेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना तपासणी, प्रसूती तसेच प्रसूतीनंतर घरी सोडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत मेळघाटमध्ये १०२ क्रमांकाच्या एकूण ६६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यापैकी चिखलदरा तालुक्यात ३१ रुग्णवाहिका कार्यरत असून यात ७ रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयात तर २४ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये कार्यरत आहेत. १०२ रुग्णवाहिका सेवा केवळ जननी सुरक्षा योजनेपुरती मर्यादित न ठेवता आपत्कालीन रुग्णांच्या वाहतुकीसाठीही वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. या सेवेच्या कार्यक्षमतेत वाढ करून ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना अधिक जलद व प्रभावी वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.(102 ambulance services will be made more effective in Melghat)