अहिल्यानगर : प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रणखांब परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, वडगाव पान परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकल्याचा धक्कादायक घटना घडली. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी माथेफिरुचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. (Acid Attack on Schoolgirl in Sangamner)
पिडित विद्यार्थिनी ही वडगाव पान येथील एका विद्यालयात इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असून, आज मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर हाडके मळा येथून सायकलवरून घरी जात असताना एका अज्ञात तरुणाने तिच्यावर ॲसिड फेकले.
या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. (Acid Attack on Schoolgirl in Sangamner)
दरम्यान, या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे वडगाव पान परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. (Acid Attack on Schoolgirl in Sangamner)