कोल्हापूर : प्रतिनिधी : संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने संध्यामठ तरुण मंडळाचा २-१ असा पराभव करत अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या हंगामात सलग दुसऱ्यांदा जुना बुधवार संघाने अंतिम फेरीत धडक मारली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांच्या स्मरणार्थ भाजप आणि तटाकडील तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा खेळवली जात आहे. (Atal Cup)
छत्रपती शाहू स्टेडियमवर जुना बुधवार आणि संध्यामठ संघातील सामना चुरशीचा झाला. पूर्वाधात दोन्ही संघांनी आघाडी मिळवण्यासाठी जोरदार चढाया केल्या. ३३ व्या मिनिटाला जुना बुधवारच्या सचिन मोरेने कॉर्नर किकवर हेडरद्वारे चेंडूला जाळयाची दिशा दाखवली. मध्यंत्तरापूर्वी जादा वेळेत जुना बुधवारला कॉर्नर किक मिळाली. यावेळी डी मध्ये मिळालेल्या गोंधळाचा फायदा घेत रविराज भोसलेने हेडद्वारे गोल केला. मध्यंत्तरास जुना बुधवार संघ २-० असा आघाडीवर होता. (Atal Cup)
उत्तरार्धात परतफेड करण्यासाठी संध्यामठने सुत्रबद्ध चढाया केल्या. ६१ व्या मिनिटाला एल.टी. डोंगल यांने मैदानी गोल करत संध्यामठच्या पहिल्या गोलची नोंद केली. सामना बरोबरीत आणण्यासाठी संध्यामठने चढायांचा वेग वाढविला. पण जुना बुधवारने भक्कम बचाव ठेवत सामना २-१ अशा फरकाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. (Atal Cup)
शुक्रवारचा उपांत्य सामना : खंडोबा तालीम मंडळ वि. शिवाजी तरुण मंडळ, दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :