-मारुती फाळके
संपतराव गायकवाड चांगल्या कामाचे भरभरुन कौतुक करायचे आणि चुकीच्या गोष्टींवर निर्भयपणे प्रहारही. आपल्या वाणी आणि लेखणीतून समाजमन विवेकी बनविणारा सत्शील कर्मयोगी अकाली जाण्याने अनेकांना पोरके करुन निघून गेला. मातृहृदयाचे संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांच्यातला शिक्षक शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत होता. सेवानिवृत्त होताना आपल्या पगारातील दहा टक्के हिस्सा ते गरजू, गरीब विद्यार्थ्यांना मदत म्हणून सढळ हाताने पाठबळ द्यायचे.
कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर- विरळे गाडी पावणे दहाच्या दरम्यान हारुगडेवाडीत आली की, गाडीतून मध्यम देहयष्टी, गोरा वर्ण, करारी चेहरा, डोळ्यात विलक्षण चमक आणि अंगात विलक्षण चपळाई आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले कोल्हापूरचे गायकवाड गुरुजी आलेले गावकरी ओळखायचे. सोमवारची विरळे गाडी आणि गायकवाड गुरुजी हे गाठीला हसड गाठ बांधावं असे गायकवाड साहेब व विरळे गाडीचं ट्युनिंग जमलं होतं. वाडीच्या एस. टी. थांब्यावरच्या कोपऱ्यावर असलेल्या रावणाच्या छोट्या दुकानापासून गायकवाड गुरुजींची पावले शाळेकडे वळायची. कोल्हापूरचं गुरुजी आलं म्हटलं की शाळेचा ‘नूरच’ पालटायचा. शाळेतली हारुगड्याची, रावणाची, सावताच्यातली, फाळके गुरुजींच्या मोठ्या घरातली, गोसाव्याची पोरं हरखून टूम व्हायची; कारण सतत मुलांच्या गराड्यात राहणारा गुरुजी म्हणून संपतराव गायकवाड यांची पंचक्रोशीत ओळख होती.
साधारण १९७० च्या दशकातील सुरवातीच्या नोकरीच्या गावातील ही कर्म कहाणी आहे. संपतराव गायकवाड यांचे नोकरीचे पहिले गाव शाहूवाडी तालुक्यातील हारुगडेवाडी. प्रसन्न व्यक्तिमत्व, वाणीत माधुर्य, प्रभावी वक्तृत्व, कोणत्याही विषयातील अध्यापनावरची पकड असे शिस्तप्रिय शिक्षक, म्हणून संपतराव गायकवाड यांची भेडसगाव परिसरात ओळख होती. बहुजन समाजाच्या मुलांनी शिकावं, त्यांच्या हाती लेखणी आणि पदवी आल्याशिवाय त्यांच्या कुटुंबाचा उद्धार नाही हे गायकवाड गुरुजींनी ओळखलं होतं म्हणून कित्येक बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना त्यांनी शिकण्यासाठी प्रवृत्त केलं. शिक्षणावाचून आबाळ होत असलेल्या काही मागासवर्गीय मुलांना तर त्यांनी दत्तकच घेतलं होतं. हारुगडेवाडीतील संजय आसवले, विलास हारुगडे, शांताराम फाळके, संतराम फाळके, आनंदा हारुगडे हे त्यांनी घडवलेले विद्यार्थी आजही गुरुजींमुळेच आम्ही घडलो हे सांगताना त्यांचा अभिमानाने ऊर भरून येतो. त्यावेळच्या अभ्यासक्रमात असणारा इतिहासातील महाराणा प्रताप यांचा ‘हळदीघाटचं युद्ध’ हा पाठ गायकवाड गुरुजींनीच शिकवावा, इतिहासातील प्रसंग आपल्या पहाडी आवाजात धीरगंभीर वातावरणात उभे करून विद्यार्थ्यांसमोर सादर करणारा हा शिक्षक निराळाच. इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित या विषयावर सुद्धा त्यांची पकड होती. संपतराव गायकवाड म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावभावनांशी एकरूप होणारे विद्यार्थी प्रिय, शिस्तप्रिय शिक्षक आणि एक ‘अवलिया माणूस’म्हणून त्यांच्या विद्यार्थ्यांना भावतात.
जीवनाची काही तत्त्वं आणि मूल्यं अंगीकारून वाट चालणारा आणि जीवनाची नवी दिशा शोधणारा हा व्रतस्थ कर्मयोगी पुढे अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या परिक्षातून शिक्षण खात्यात उपशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्रभारी प्राचार्य व त्यानंतर सहायक शिक्षण उपसंचालक म्हणून आदर्श प्रशासकाची सेवा बजावताना सेवानिवृत्त झाले.
नोकरीच्या सुरुवातीच्या काळामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मुलांच्या गराड्यात रमणारा हा लोकशिक्षक सुट्टीनंतर ही मुलांच्या च सान्निध्यात असायचा. नित्यनेमाने पुस्तकांच्या सानिध्यात राहून वाचन करणे, टिपण काढणे ही त्यांची जणू सवयच होती.
सतत शाळा, विद्यार्थी, समाज यांच्याप्रती असलेली बांधिलकी यातून ते नेहमीच विद्यार्थ्यांना घडवत गेले. अगदी शाळा सुटल्यानंतर सुद्धा ते राहत असलेल्या शंकर हारुगडे यांच्या घरातील माडीवर विद्यार्थ्यांना अभ्यासाला बोलवत. राहत्या खोलीत सुद्धा त्यांनी मुलांची अभ्यासिका निर्माण केली होती.
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे हा त्यांचा कटाक्ष होता. अभ्यासातून विद्यार्थ्यांनी स्वतःतील कारक कौशल्याचा विकास करावा यासाठी ते आग्रही होते ,यासाठी मुलांसोबत खेळ खेळायचे. सातत्याने ज्ञानार्जन, वाचन, चिंतन, मनन ही त्यांची व्यासंग संकलनाची वेगळी शैली होती. हारुगडेवाडीत राहायला असताना कधीच त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतेच काम लावले नाही. स्वतः पाणी आणायचे, स्वतः भाकरी करून, स्वतः जेवण बनवून आपली नोकरी इमानइतबारे केली.
शाहूवाडी सारख्या दुर्गम डोंगराळ भागातील अनेक बहुजन समाजातील लेकरांचे संसार उभे केले. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांची घरे उभी केली. प्रसंगी पदरमोड करून कित्येकांना कोल्हापूरला शिक्षणासाठी आणले. गायकवाड गुरुजी हे कोल्हापूरचे गुरुजी म्हणून सर्व भागांमध्ये त्यांची प्रसिद्धी- ख्याती होती.
मुलांच्या भावभावनांशी, त्यांच्या प्राप्त परिस्थितीची सुखदुःखे समजावून घेत नेहमी मदतीसाठी सारसावलेले. विद्यार्थ्यांने एखादी शंका विचारल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान जोपर्यंत ओळखता येत नाही तोपर्यंत गायकवाड गुरुजी आकलनाच्या शेवटच्या पायरी पर्यंत जाऊन संकल्पना, संबोध स्पष्ट करायचे.
शाळेच्या गटसंमेलनात एखादा आदर्श पाठ घ्यावा तो गायकवाड गुरुजींनीच. आज त्यांचे कित्येक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी, आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श माणस म्हणून समाजात उभे आहेत हे गायकवाड गुरुजींनी लावलेल्या शिस्तप्रिय संस्काराचेच प्रतिबिंब आहे.
महाराष्ट्रात नावाजलेला कोल्हापूरचा शिष्यवृत्ती पॅटर्न उभारीला आणण्यासाठी भुदरगड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी कंबर कसली. शिक्षकांना विश्वास दिला आणि भुदरगड तालुक्याच्या शिष्यवृत्ती यशाचा महाराष्ट्रभर डंका वाजला. जाईल त्या तालुक्यात गुणवतेला प्राधान्य दिले.आणि बहुजनांची लेकरं घडवणाऱ्या शाळांमध्येस्पर्धा परीक्षेची गुणवत्ता चळवळ उभी केली आहे. नोकरीत असताना आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावताना त्यांनी कधीच तत्त्वांशी तडजोड केली नाही.
Time, Tiffine and Ticket या संकल्पनेतून शिक्षकांच्यासाठी प्रेरणा देणारी शिबिरे आयोजित केली. शाळा तपासणीला जाताना स्वतःचा डबा घेऊन जायचा. व्याख्यानाच्या वेळी मिळालेली शाल तिथल्याच एखाद्या लेकीला द्यायचे. दीपप्रज्वलनासाठी चिमुकल्या मुलीला बोलवायचे. व्याख्यानात बोलत असताना कापरा होणारा स्वर काळजाचा वेध घ्यायचा आणि डोळ्यांच्या कडा कधी ओलावल्या कळायच्याही नाहीत. वागण्यात कमालीचा साधेपणा. स्वभावातला ऋजूपणा आणि स्निग्धता सर्वांना आपलेसे करायची. सहवासात आलेल्या प्रत्येकाला बाळ हे आवडते संबोधन वापरून मातृ आणि पितृ प्रेमाने आस्थेने विचारपूस करायचे.
चांगल्या कामाचे भरभरुन कौतुक करायचे आणि चुकीच्या गोष्टींवर निर्भयपणे प्रहारही. आपल्या वाणी आणि लेखणीतून समाजमन विवेकी बनविणारा सत्शील कर्मयोगी अकाली जाण्याने सर्वांना पोरका करुन निघून गेला. मातृहृदयाचे संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांच्यातला शिक्षक शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत होता. सेवानिवृत्त होताना आपल्या पगारातील दहा टक्के हिस्सा ते गरजू, गरीब विद्यार्थ्यांना मदत म्हणून सढळ हाताने पाठबळ द्यायचे. आजही सेवानिवृत्तीनंतरसुद्धा असंख्य शिक्षकांना मार्गदर्शन करणे, पाठीवर हात टाकून चांगल्या कामाचे कौतुक करणे, नवनिर्मितीसाठी प्रोत्साहन देणे असे ते समस्त शिक्षक वर्गाचे प्रेरणास्रोत होते. स्वच्छ, निष्कलंक चारित्र्य,कमालीचे प्रामाणिक व्यक्तिमत्व, आंतरबाह्य निर्मळ असणारे संपतराव गायकवाड यांची अचानक झालेली एक्झिट फारच वेदनादायी आहे.
संपत गायकवाड हे शिक्षण खात्यातील नावाजलेले प्रशासकीय अधिकारी, प्रेरणादायी लेखक, प्रसिद्ध व्याख्याते समाजप्रबोधनकार होते. त्यांची पणत्यांचा प्रकाश, ज्ञानरचनावाद, सगुणातील ईश्वर आई, बाप समजून घेताना, शोधांच्या जन्मकथा, मुले समजून घेताना अशी प्रकाशित पुस्तके आहेत. शैक्षणिक आणि आई या विषयावर त्यानी कोणतेही मानधन न घेता शेकडो व्याख्याने दिली. आजवर असंख्य साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श माणूस म्हणून सन्मान केला.
आपल्या सेवेची शाहूवाडी तालुक्यासारख्या दुर्गम, डोंगराळ भागातून नोकरीची सुरवात करणारा हा हळव्या मनाचा शिक्षक अगदी परवा शाहूवाडीत आयोजित केलेल्या नवनियुक्त शिक्षकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करून वंचितांच्या, सामान्याच्या आयुष्यात परिवर्तनाची बीजे पेरण्यासाठी शिक्षकांच्या नसानसात स्फुल्लिंग चेतवून आला होता. सरांना अजून खूप काम करायचे होते. समाजातल्या घसरत चाललेल्या संस्कार मूल्यांवर शाश्वत काम उभे करायचे होते पण ते अपूर्ण राहणार नाही याची हमी मात्र गायकवाड सरांना मानणारा विद्यार्थी वर्ग आणि गोतावळा निश्चितपणे करेल, अशी आशा वाटते. आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.