नवी दिल्लीः साहित्य अकादमीने २०२५ च्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली असून मराठीमध्ये चित्रकार राजू बाविस्कर यांच्या `काळ्या निळ्या रेषा` या आत्मचरित्राची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
साहित्य अकादमीने २४ भाषांमधील पुरस्कारांसाठी त्या त्या भाषांमधील परीक्षण समितीने निवडलेल्या उत्कृष्ट पुस्तकांची घोषणा केली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये आठ कवितासंग्रह, चार कादंब-या, सहा कथासंग्रह, दोन निबंधसंग्रह, एक समीक्षाग्रंथ, एक आत्मचरित्र आणि दोन स्मरणलेखांच्या पुस्तकांचा समावेश आहे. ३० जानेवारी २०२५ रोजी साहित्य अकादमीने पुस्तके मागवण्यासाठी जाहिरात देऊन पुरस्कार निवडीची प्रक्रिया सुरू केली होती.
मराठी भाषेसाठी पुरस्कार जाहीर झालेले राजू बाविस्कर यांचे `काळ्या निळ्या रेषा` हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे.
यावर्षी मराठी भाषेतून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्यांमध्ये पुढील पुस्तकांचा समावेश होताः १) कोलाहल (वसंत दत्तात्रेय), २) काम तमाम @ वाघा बॉर्डर (सतीश तांबे), ३) भुरा (शरद बाविस्कर), ४) इन्शाअल्ला (अभिराम भडकमकर), ५) सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास (रवींद्र इंगळे चावरेकर), ६) काळ्या निळ्या रेषा (राजू बाविस्कर), ७) रात्र भरात आहे (देविदास फुलारी), ८) अधिवास (बाबू बिरादर), ९) मनसमझावन (संग्राम गायकवाड), १०) बाऊल (सौमित्र – किशोर कदम) आणि ११) विंदांची कविता- शैलीवैज्ञानिक विश्लेषण (रमेश धोंगडे).
मराठी भाषेतील पुरस्कार निवड समितीमध्ये श्रीमती मंगला गोडबोले, नागोराव तम्माजी उतकर आणि डॉ. राजन गवस यांनी काम पाहिले.
हिंदी भाषेमध्ये ममता कालिया यांच्या `जीते जी इलाहाबाद` या पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाला आहे.