नवी दिल्ली : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी १६ जुलै रोजी होणार होती. येमेनमध्ये तिला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी आता काही काळ पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे तिला काहीसा दिलासा मिळाला आहे. (Relief for Indian nurse)
२०१७ मध्ये तिच्या येमेनी व्यावसायिक भागीदाराच्या हत्येप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आले होते.
” सुरुवातीपासूनच या प्रकरणात सर्वतोपरी मदत करत असलेल्या भारत सरकारने अलिकडच्या काळात निमिषा प्रियाच्या कुटुंबाला दुसऱ्या पक्षाशी परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत,” असे सूत्रांनी सांगितले. (Relief for Indian nurse)
“संवेदनशीलता असूनही, भारतीय अधिकारी स्थानिक तुरुंग अधिकाऱ्यांशी आणि अभियोक्ता कार्यालयाशी नियमित संपर्कात आहेत. ज्यामुळे ही स्थगिती निश्चित झाली आहे,” असे सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
सततच्या अपील आणि राजनैतिक हस्तक्षेपानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. केरळमधील पलक्कड येथील ३८ वर्षीय निमिषाला वाचवण्यासाठी “शक्य तितके” प्रयत्न करत आहेत, असे केंद्र सरकारच्यावतीने सोमवारी (१४ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते.
२०१७ मध्ये तिचा येमेनी व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदी याची हत्या केल्याबद्दल दोषी ठरलेली प्रिया २०२० पासून मृत्युदंडाची शिक्षा भोगत आहे. येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने नोव्हेंबर २०२३ मध्ये तिची शिक्षा कायम ठेवली. ती राजधानी साना येथे तुरुंगात आहे. हे शहर हुथींच्या नियंत्रणाखाली आहे. तेथे आपले राजनैतिक संबंध नाहीत. (Relief for Indian nurse)
अॅटर्नी जनरल आर वेंकटरमानी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की सरकारने ‘‘काही शेखांशी संपर्क साधला आहे. ते तेथील खूप प्रभावशाली लोक आहेत.” आणि स्थानिक सरकारी वकिलांना फाशीची तात्पुरती स्थगिती देण्याची विनंती करण्यासाठी पत्र लिहिले होते.