नवी दिल्ली/मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे उघड झाले आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजप खासदार कंगना राणावत यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. (Sunetra Pawar at RSS programme)
याबाबतचे फोटो राणावत यांनीच ‘एक्स’वर पोस्ट केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये सुनेत्रा पवार बोलताना दिसत आहेत.
“माझ्या घरी राष्ट्र सेविका समिती महिला शाखेचे आयोजन केले होते. आपण सर्वजण एकत्र येऊन सनातन मूल्य, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीयत्वाची भावना आणखी प्रखर बनवू. मानव सेवा आणि राष्ट्रनिर्माण आणि सनातन संस्कृतीचे संरक्षण यासाठी सतत कार्य करत राहू, असा आमचा संकल्प आहे. माहिलांची जागरूकता आणि सहभागच देशाला शक्तिशाली बनवतो,” असे कंगना राणावत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Sunetra Pawar at RSS programme)
वर्धा दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी विचारले असता, मला याबद्दल काही माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर त्यांनी दिले.
‘‘माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट-मिनिट माहिती नसतं. मी आता विचारतो की, का गं कुठं गेली होती?” असं खोचक उत्तर पवार यांनी दिले.
कंगना राणावत यांच्या घरातील बैठकीची चर्चा सुरू झाल्यानंतर यावर सुनेत्रा पवार यांनीही खुलासेवजा उत्तर दिले आहे.
कार्यपद्धती समजून घेण्यासाठी गेले होते : सुनेत्रा पवार
‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘‘एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दांत माझी भूमिका मांडली.’’ (Sunetra Pawar at RSS programme)
कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.