फलटण: फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे माजी सभापतीरामराजे नाईक निंबाळकर यांना धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत त्यांचे पुत्र, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) उमेदवार अनिकेत राजे निंबाळकर यांचा भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी ६०० मतांच्या फरकाने पराभव केला आहे. या निकालामुळे फलटणमध्ये सत्तांतर घडले असून भाजपने नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे.
सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर मैदानात होते. तर शिवसेना (शिंदे गट) कडून अनिकेत राजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. (A setback for Ramraje in Phaltan)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारासाठी सभा घेतली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवारासाठी प्रचार केला. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.अखेर भाजपने बाजी मारत नगराध्यक्षपद मिळवले. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाचे शिल्पकार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (A setback for Ramraje in Phaltan)
नगरपरिषदेच्या एकूण २७ जागांपैकी १६ जागांवर भाजपने विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे फलटण नगरपरिषदेत सत्तांतर निश्चित झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाव असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर गटाला हा मोठा धक्का आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट पराभव झाल्याने त्यांच्या गटाची राजकीय ताकद कमी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (A setback for Ramraje in Phaltan)