कोल्हापूर : प्रतिनिधी : कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीस करवीचे तहसीलदार स्वप्निल पवार, वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे, अक्षय कुरणे, माध्यमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी सी. एस. ओतारी, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, प्राथमिक शिक्षण विभागाच्या रत्नप्रभा दवंडे, डॉ. प्रवीण कोडोलीकर, शाहू स्मारक व्यवस्थापक दत्तात्रय नागर, अतुल पवार, बबनराव रातणे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, तसेच शिव प्रबोधिनीचे विजय पाटील उपस्थित होते. (Rajarshi Shahu Birthplace Museum Ceremony)
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना देवून जिल्ह्यातील शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लोकार्पण सोहळ्यास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (Rajarshi Shahu Birthplace Museum Ceremony)
हा सोहळा लोकोत्सवासारखा साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. यानिमित्ताने समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंच व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ दरम्यान ‘शाहू समता ज्योत रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली दुपारी तीन वाजता दसरा चौक येथून सुरू होणार आहे. (Rajarshi Shahu Birthplace Museum Ceremony)