मुंबई : प्रतिनिधी : बारामती, राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी ग्रीन सिग्नल दिला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनानंतर बारामती आणि राहुरी येथे पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे जाहीर केले आहे. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ही निवडणूक लढणार नाही अशी घोषणाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राष्ट्रवादीने निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने काँग्रेसने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Congress Gives Green Signal for Baramati and Rahuri By-elections)
मुंबईत गुरुवारी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत राहुरी आणि बारामतीची निवडणूक लढवण्यावर काँग्रेस पक्ष ठाम असून पक्षश्रेष्ठीकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सांगितले जाते. याबाबत माहिती देताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राहूल आणि बारामती येथून इच्छुक उमेदवारांशी आमची चर्चा झाली आहे. बारामतीसाठी सहा तर राहुरीसाठी चार अर्ज आले आहेत. उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत दोन दिवसात पक्ष निर्णय घेईल. (Congress Gives Green Signal for Baramati and Rahuri By-elections)
राहुरीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातच काँग्रेसनेही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राहुरीत काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा उमेदवार असणार हे लवकरच स्पष्ट होईल. बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार आग्रही असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत सहा एप्रिल आहे. २३ एप्रिलला मतदान तर चार मे ला मतमोजणी होणार आहे. (Congress Gives Green Signal for Baramati and Rahuri By-elections)